Ayodhya Verdict; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरती सोशल मीडियावर व्यक्त होणे पडू शकते महागात
Ram Mandir Babri Masjid Issue | (PTI)

राम मंदिर-बाबरी मशिद खटल्याचा निकाल आता थोडेच दिवसात लागणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेला असा हा अयोध्येचा ऐतिहासिक खटला. या निकालाच्या पार्शवभूमीवरच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी सर्व पोलिसांच्या सुट्ट्या आणि रजा रद्द करण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर नागरिकांनी सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. यासंदर्भात पावलं उचलण्यासाठीच सॊमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक घेण्यात आली.

कोणत्याही गोष्टीचे फायदे-तोटे हे असतातच. या एकाच नाणम्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे सोशल मीडिया सुद्धा या गोष्टीपासून काही अलिप्त नाही. बऱ्याचदा चांगल्या बातम्या पसरण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक कारणीभूत ठरतं. तसेच अनेक राजकीय चर्चा सुद्धा तिथे रंगतात. पण काही वेळा अफवा आणि अनेक वादविवादांचं उगमस्थान देखील ते ठरतं. या खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे, जी या देशातील सर्वोच्च न्यायव्यवस्था आहे आणि ज्यावर सर्व भारतीय नागरिकांचा विश्वास आहे. म्हणूनच हा निकाल सर्व भारतीयांनी पाळणे आणि त्याचा आदर करणे हे बंधनकारक आहे.  (हेही वाचा. राम मंदिर- बाबरी मशीद वादाचा काय होता इतिहास? जाणून घ्या सविस्तर)

पैकी खालील काही सूचना पाळणे अनिवार्य आहे:

  • कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे संदेश पाठवू नयेत.
  • निकालानंतर कोणत्याही प्रकारचा जल्लोष करू नये.
  • धार्मिक भावना दुखावण्याचा हेतूने काहीही शब्दोच्चार करू नयेत .
  • जातीय दंगलीच्या अनुशंघाने जुने व्हिडिओ, फोटो पुन्हा प्रसारित करू नयेत.

या सर्व गोष्टींचे उल्लंघन केल्यास सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा जरी जागेसंदर्भात असला तरीही, धार्मिक भावना भडकावल्याच्या आरोपाखाली त्याचेवर कार्यवाही करण्यात येईल. सर्व नागरिकांना शांतता पाळण्याचे आवाहन करत त्यांच्या सर्व हालचालींवर पोलीस आणि सायबर सेलचे लक्ष असल्याने कुठेही काही गडबड आढळल्यास दखलपात्र गुन्ह्याची नोंद करून थेट न्यायालयासमोर हजर केले जाईल असेही सांगण्यात आले आहे.

खालील कलमांतर्गत कारवाई होऊ शकते:

कलम 295

कोणत्याही धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानाचे नुकसान करणे अथवा ते अपवित्र करणे.

कलम 295  (अ)

कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अनादर करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्सर आणि दुष्ट हेतूने कृती करणे.

कलम 298

धार्मिक भावना दुखावण्याचा बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारणे.