जाणून घ्या टॅक्स भरत असलेल्या प्रत्येकासाठी का महत्वाचा आहे फॉर्म १६

आपण जर जॉब करत असाल आणि कंपनीकडून आपल्या पगारातून टीडीएस कापला जात असेल तर कंपनीला पुरावा म्हणून त्या संदर्भातील एक विहित नमुन्यातील विवरणपत्र आपल्याला देणे आवश्यक आहे त्याला फॉर्म १६ असे म्हणतात. फॉर्म १६ मध्ये तुमचे उत्पन्न, कराद्वारे कापलेली रक्कम, मिळत असलेले भत्ते या सर्वांचा तपशील असतो. हे विवरणपत्र प्रत्येक वर्षी दिली जाते आणि ते तुम्हाला ३१ ऑगस्ट पूर्वी भरणे गरजेचे असते.

फॉर्म १६चे दोन भाग पडतात, भाग ए आणि भाग बी

भाग ए : यामध्ये नियोक्ता आणि कर्मचारी अशा दोघांच्याही पीएएन (स्थायी खाते क्रमांक) आणि टीएएन (कर कपात व संकलन खाते क्रमांक) यांची माहिती असते. याव्यतिरिक्त कंपनीचे नाव आणि पत्ता, तुम्ही कंपनीसोबत कधी काम केले आहे याची माहिती तसेच तुमच्या मासिक वेतनामधून टीडीएसच्या रुपात कपात झालेल्या रकमेचा तपशीलही असतो.

भाग बी : भाग बी हा ए पेक्षा अधिक महत्वाचा आहे कारण यामध्ये नियोक्त्याद्वारे जमा केलेल्या रकमेचा पूर्ण तपशील असतो. यामध्ये निव्वळ वेतन रक्कम, सवलत आणि भत्ते, मनोरंजन भत्ता आणि रोजगारांवरील कर यांद्वारे झालेली कपात, मुख्य पगाराच्या अंतर्गत लागू असलेले उत्पन्न, अध्याय ६-ए (८० सी, ८० डी, ८० ए इत्यादी) अंतर्गत झालेली कपात, एकूण उत्पन्नावरील कर इ. तसेच नियोक्त्याने वरील नमूद केलेल्या तपशीलांचे सत्यापन याची माहिती असते.

कोणी फॉर्म १६ भरणे अपेक्षित आहे?

भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या नियमांनुसार, प्रत्येक पगारदार व्यक्ती जो करपात्र ब्रॅकेट अंतर्गत येतो त्याला हा फॉर्म भरणे अपेक्षित आहे.

हा कसे मिळवाल?

आपला नियोक्ता इतर कागदपत्रांसोबत हा दस्तऐवज आपल्याला प्रदान करेल, जो की पगार प्रमाणपत्र म्हणूनही ओळखला जाईल. आपण करपात्र ब्रॅकेट अंतर्गत येत असल्यास, आपला प्राप्ती कर परतावा भरताना हा फॉर्म अपरिहार्य असेल. आपल्या नियोक्त्याकडून ते प्राप्त न केल्यास, आपण आयकर विभागच्या वेबसाइटवरून याची पीडीएफ आवृत्तीदेखील डाउनलोड करू शकता.

फॉर्म १६ भरणे का गरजेचे आहे?

आर्थिक वर्षासाठी आयकर परतावा दाखल करताना आपल्याला फॉर्म १६ ची आवश्यकता आहे. हे आपली एकूण कमाई आणि आपल्या पगारातून वजा केलेले आयकर दाखवते. आपण आपल्या मिळकतीमधून सरकारकडे कर जमा केला आहे याचा हा पुरावा आहे. कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी अर्ज करतांना, बॅंक त्यांच्या पडताळणी प्रक्रियेचा एक भाग म्हणून आपल्या फॉर्म १६ची विचारणा करतात.

आपले रिटर्न भरताना फॉर्म १६ मध्ये खालील गोष्टींचा तपशील असणे आवश्यक आहे.

 • करपात्र वेतन
 • कलम ८0 सी कपात
 • विभाग ८0 सी कपात (निव्वळ आणि वजा करता येण्याजोगा रक्कम)
 • टीडीएस (वजा केलेला कर)
 • कर देय किंवा परतावा देय

आवश्यक असलेला अतिरिक्त तपशील

 • नियोक्त्याने कपात केलेला टीडीएस
 • नियोक्त्याचा टीएएन
 • नियोक्त्याचा पीएएन
 • नियोक्त्याचे नाव आणि पत्ता
 • वर्तमान मूल्यांकन वर्ष
 • आपले (करदाता) नाव आणि पत्ता
 • तुमचा पीएएन

फॉर्म १६चा वापर करून ऑनलाईन आपला आयकर परतावा असा भरा

खालील गोष्टी तुम्ही तुमच्या फॉर्म १६ वरून थेट भरू शकता

 • निव्वळ पगार माहिती (ग्रॉस सॅलरी)

आपल्या फॉर्म १६चा भाग बी तपासा. पहिल्या क्रमांकावर तुमच्या निव्वळ पगाराचा तपशील असेल.

 • अध्याय ६- ए च्या अंतर्गत झालेली कपात

फॉर्म १६च्या भाग बीच्या नवव्या क्रमांकावर आपल्याला अध्याय ६- ए अंतर्गत झालेल्या कपातींचे तपशील दिले जातील.

 • निव्वळ देय कर

आपल्या फॉर्म १६बी मध्ये अठराव्या क्रमांकावर याची माहिती असेल.

 • टीडीएस

फॉर्म १६ब मध्ये आपल्या टीडीएसचे तपशील उपलब्ध्न असतील

जर आपण त्याच आर्थिक वर्षात नोकरी बदलली असेल तर आपल्याला एकापेक्षा अधिक फॉर्म १६ (नोकरीच्या संख्येनुसार) प्रत्येक नियोक्त्यासाठी स्वतंत्रपणे भरावे लागतो.

आपल्याला आर्थिक वर्ष संपल्यानंतर म्हणजेच ३१ मार्च नंतर ऑफिसकडून जो फॉर्म १६ देण्यात येतो, त्याला टीडीएस प्रमाणपत्र असे म्हणतात. टीडीएस प्रमाणपत्र मिळाले म्हणजे आयकर भरून झाला व आपली जबाबदारी संपली असा समज पूर्णत: चुकीचा आहे. जोपर्यंत आपण आयकर विवरन पत्र  दाखल करीत नाही तोपर्यंत आयकर भरून झाला असे समजू नये.