Bank Rules Change From Oct: आज 1 ऑक्टोबर नवीन महिन्याची सुरुवात आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारने बदललेले अनेक नियम आजपासून लागू केले जात असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते सर्व नवीन नियम माहित असले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला ती कामे वेळेत पूर्ण करता येतील. यामध्ये अटल पेन्शन योजना, म्युच्युअल फंड, छोट्या योजनांवरील व्याजदर आणि कार्ड टोकनायझेशन यासारख्या नियमांचा समावेश आहे. चला तर या नवीन नियमांविषयी जाणून घेऊयात...
अटल पेन्शन योजना
केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेत 1 ऑक्टोबरपासून मोठा बदल करण्यात आला आहे. आता आयकर भरणारी कोणतीही व्यक्ती या योजनेत सामील होऊ शकत नाही. सध्या 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या पेन्शन योजनेत सहभागी होऊ शकते. या योजनेंतर्गत, वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, व्यक्तीला 5,000 रुपयांपर्यंत निवृत्ती वेतन दिले जाते. (हेही वाचा - Small Saving Schemes: खूशखबर! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, लहान बचत योजनांच्या व्याजदरात वाढ)
कार्ड टोकनायझेशन -
ऑनलाइन फसवणुकीपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने कार्ड टोकनायझेशन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबरपासून हा नियम लागू झाला आहे. यानंतर, पेमेंट करताना कोणतीही व्यापारी वेबसाइट तुमची क्रेडिट आणि डेबिट कार्ड संबंधित माहिती संग्रहित करू शकणार नाही. त्याऐवजी तुम्ही फक्त टोकन क्रमांक टाकून सहजपणे पैसे देऊ शकता.
म्युच्युअल फंडात नामांकन -
1 ऑक्टोबरपासून लागू झालेल्या नवीन नियमानुसार, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना त्यांच्या नॉमिनीची माहिती देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. जर गुंतवणूकदाराने नॉमिनीचे तपशील दिले नाहीत, तर त्याने/तिने नामांकनाची सुविधा न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगणारा एक घोषणापत्र भरावा लागेल.
लहान बचत योजनांवर व्याज -
किसान विकास पत्र आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यासारख्या छोट्या बचत योजनांवर केंद्र सरकारने 29 सप्टेंबर रोजी वाढवलेला व्याजदर 1 ऑक्टोबरपासून लागू झाला आहे. नवीन व्याजदर ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीसाठी वैध आहे.