Small Saving Schemes: खूशखबर! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, लहान बचत योजनांच्या व्याजदरात वाढ
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

Small Saving Schemes: सणासुदीच्या काळात केंद्र सरकार (Central Government) ने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. सरकारने अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, केंद्राने ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याज दर 7.4 टक्क्यांवरून 7.6 टक्के इतका केला आहे. यासोबतच किसान विकास पत्राचा कालावधी आणि व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे. किसान विकास पत्राचा व्याज दर आता 123 महिन्यांच्या मुदतीसाठी 7 टक्के आहे, पूर्वी 124 महिन्यांच्या मुदतीसाठी तो 6.9 टक्के होता.

त्याचप्रमाणे, आता पोस्ट ऑफिसमधील तीन वर्षांच्या मुदत ठेवीवर पूर्वीच्या 5.5 टक्क्यांच्या तुलनेत आता 5.8 टक्के व्याज मिळेल. तथापि, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (व्याज दर 7.1 टक्के), सुकन्या समृद्धी योजना (7.6 टक्के), बचत ठेव (4 टक्के) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (6.8 टक्के) यासारख्या अधिक लोकप्रिय योजनांसाठी व्याजदर बदललेले नाहीत. (हेही वाचा - Aadhaar Card Fraud: पब्लिक कंप्यूटर वरून आधार कार्ड डाऊनलोड करत असाल तर सावधान! UIDAI ने दिलाय इशारा)

दरम्यान, एक वर्ष आणि पाच वर्षांच्या मुदत ठेवींचे दर देखील अनुक्रमे 5.5 टक्के आणि 6.7 टक्क्यांवर अपरिवर्तित ठेवण्यात आले आहेत. सरकारने 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या तिमाहीसाठी लहान बचत योजनांवरील व्याजदरात 0.30 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.