लेखिका, कवयत्री कविता महाजन ((Photo Credits: file photo/Kavita_Mahajan_Facebook)

लोकप्रिय लेखिका, कवयित्री कविता महाजन यांचा मृत्यू साहित्य विश्वच नव्हे तर, रसिक वाचकांसह अनेकांना चटका लाऊन गेला. गेली अनेक वर्षे त्या आपल्या लिखाणातून आदिवासी, महिलांचे प्रश्न मांडत आल्या आहेत. तसेच, समाजातील अनिष्ठ रुढी-परंपरा, पुरुषसत्ताक समाज यावरुन व्यवस्थेला त्या आव्हान देत होत्या. गुरुवारी सायंकाळी अल्पशा अजाराने त्यांचे अचानक निधन झाले. मृत्यूपूर्वी पाचच दिवस आगोदर फेसबुकवरुन त्यांनी आपली अखेरची पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून त्यांचा काम करण्याचा उत्साह आणि कामाबाबतची प्रामाणीक तळमळ दिसून येते.

कदाचित नियतीच्या मनात नसावे..

अखेरच्या फेसबुक पोस्टमधून त्यांनी आपल्या आजारपणाबद्दल लिहिले आहे. पण, ते लिहिताना आपल्याला आणखी काम करण्याची इच्छा असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत. ब्र, भिन्न आणि कुहू या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या. मात्र, इतकीच त्यांची ओळख नाही. त्यांचे अनेक कविता संग्रह, कादंबऱ्या आणि इतर पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. समाजातील ज्वलंत प्रश्न घेऊन पीढ्यानपीढ्या व्यवस्थेच्या वर्चस्वाखाली दबलेल्या समूहाला त्यांनी आवाज मिळवून द्यायचा प्रयत्न केला. त्यात बऱ्याच अंशी त्यांना यश आले. पण, त्यांना आणखीही काम करायचे होते. कदाचित नियतीच्या मनात ते नसावे. त्यांचा अनेकांच्या मनाला चटका लावणारा मृत्यू झाला.

आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये त्या म्हणात,

'नवी जागा अजून मानवत नाहीये.

ताप उलटून आला, तो जोमदारपणे. भ्रम भासावळी घेऊन आला.

घरात माणसं फिरताना दिसू लागली आणि अजून काय काय.

ग्लानीत किती काय बडबडले हे लेकच जाणे.

काल संध्याकाळी जरा उठून बसले आणि पाहते तर लेकीला तसाच ताप.

पुन्हा डॉक्टरचं दार गाठलं.

थोडं काम केलं उठतबसत, पण डोकं चालत नाहीये.

ताप उतरावेत आणि लवकर सुरू व्हावं रुटीन. कामं वाट पाहताहेत.'

कविता महाजन अल्पपरिचय

५ सप्टेंबर १९६७मध्ये नांदेड येथे जन्मलेल्या कविता महाजन एक बेडर व्यक्तिमत्व होते. मनाला येईल त्यावर मनस्वी लिखाण करणे प्रसंगी व्यवस्तेचा रोष पत्करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढे नांदेडच्याच पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. मराठी साहित्य हा विषय घेऊन त्यांनी एम.ए केले होते. त्यांच्या जाण्याने साहित्य विश्वाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.