Aadhaar Card Update: जन्म प्रमाणपत्रासह आधार कार्ड नोंदणीची सुविधा लवकरच देशातील सर्व राज्यांमध्ये उपलब्ध होणार आहे. सध्या देशातील 16 राज्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. सरकारी सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली. सध्या, सरकार 16 राज्यांमध्ये आधार लिंक्ड जन्म नोंदणीची सुविधा देत आहे. ही प्रक्रिया सरकारने वर्षभरापूर्वी सुरू केली होती. त्यानंतर येत्या काही महिन्यांत देशातील सर्व राज्यांमध्ये याची अंमलबजावणी होणार आहे.
सध्या नवीन मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी पालकांना स्वतंत्रपणे आधार कार्ड नोंदणी करावी लागते. आधार लिंक्ड जन्म नोंदणी लागू झाल्यानंतर या समस्येतून सुटका होणार आहे. सूत्रांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, आधार कार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ला विश्वास आहे की, पुढील काही महिन्यांत ही सुविधा देशभरात लागू केली जाईल. (हेही वाचा - FD Interest Rate: खुशखबर! SBI ने ग्राहकांना दिलं खास दिवाळी गिफ्ट; FD व्याजदरात केली वाढ)
मुलांसाठी बायोमेट्रिक आवश्यक नाही -
पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आधार कार्ड काढण्यासाठी बायोमेट्रिक आवश्यक नाही. मुलांच्या लोकसंख्याशास्त्रीय माहितीच्या आधारे आधार कार्ड तयार केले जाते. मुलाचे वय पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरच बायोमेट्रिक्स घेतले जातात.
दरम्यान, डुप्लिकेट आधार कार्डला आळा घालण्यासाठी सरकारच्या या निर्णयाकडे पाहिले जात आहे. सध्या राज्य सरकारच्या सुमारे 650 योजना आणि केंद्र सरकारच्या 315 योजना आधार कार्ड डेटाच्या आधारे चालवल्या जात आहेत. आतापर्यंत 134 कोटींहून अधिक आधार कार्ड जारी करण्यात आले आहेत.