
FD Interest Rate: तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने FD व्याजदरात 20 बेस पॉइंट्स किंवा 0.20 टक्के वाढ केली आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन व्याजदर 15 ऑक्टोबरपासून दोन कोटींपेक्षा कमी एफडीवर लागू झाले आहेत. जवळपास दोन महिन्यांनंतर SBI ने FD व्याजदरात वाढ केली आहे. व्याजदर 10 बेसिस पॉइंट्स ते 20 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.10 टक्के ते 0.20 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहेत.
SBI च्या वेबसाइटनुसार आता गुंतवणूकदारांना 7 दिवस ते 45 दिवसांसाठी 2.90 टक्क्यांऐवजी 3 टक्के व्याज दिले जाईल. त्याचप्रमाणे, 46 दिवसांपासून ते 179 दिवसांच्या एफडीवर आता 4 टक्के व्याज दिले जाईल, जे पूर्वी 3.90 टक्के होते. 180 दिवसांपासून ते 210 दिवसांपर्यंतच्या एफडीवरील व्याज आता 4.55 टक्क्यांवरून 4.65 टक्के झाले आहे. आता बँकेने 211 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याज 4.60 टक्क्यांवरून 4.70 टक्के केले आहे. (हेही वाचा - Amul Price Hike: सणासुदीतच्या काळात अमूलने वाढवले दुधाचे भाव; लिटरमागे 2 रुपयांची वाढ)
एक वर्षापेक्षा जास्त आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदर 5.45 टक्क्यांवरून 5.6 टक्के झाला आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर आता 5.50 टक्क्यांऐवजी 5.65 टक्के व्याज मिळणार आहे. तीन वर्षांपेक्षा जास्त आणि पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याज आता 5.60 टक्क्यांवरून 5.80 टक्के करण्यात आले आहे. पाच वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याज 5.65 टक्क्यांवरून 5.85 टक्के करण्यात आले आहे.
आरबीआयने केली व्याजदरात वाढ -
रिझर्व्ह बँकेने महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या पाच महिन्यांत व्याजदरात 1.90 टक्क्यांनी वाढ केली असून, त्यानंतर सर्व व्यापारी बँका व्याजदरात वाढ करत आहेत.