बँकींग क्षेत्रासह दैनंदिन जीवनातील वस्तूंमध्ये 1 जुलै पासून झाले 'हे' मोठे बदल; वाचा सविस्तर
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

Rule Changes from 1st July 2021:  आजपासून नवीन महिना सुरु होत आहे. 1 जुलै उजाडताच  बँकिग क्षेत्रापासून दैनंदिन जीवनातील वस्तूंमध्ये अनेक मोठे बदल समोर आले आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर पडणार आहे. महागलेल्या वस्तूंमुळे खिशाला झळ बसणार असून बँकिंग क्षेत्रातील मदत गैरसोय टाळण्यासाठी जाणून घेणे गरजेचे आहे. तर जाणून घेऊया आजपासून म्हणजेच 1 जुलै पासून नेमके काय बदलले...

एलपीजी गॅस सिलिंडर महागला:

एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमती तब्बल 25.50 रुपयांनी वाढल्या आहेत. या नव्या वाढीमुळे मुंबईत 14 किलोच्या अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत 834.50 रुपये इतकी आहे. तर 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरमध्ये 84 रुपयांनी वाढ केली आहे. वाढीव दरानुसार मुंबईत 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरचा भाव 1507 रुपये झाला आहे.

दुधाच्या किंमतीत वाढ:

अमूल दुधात आजपासून  2 रुपये प्रति लीटर इतकी वाढ झाली आहे. ही दरवाढ सर्व सहकारी संस्थांना लागू होईल. असे गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ (जीसीएमएमएफ) यांनी सांगितले. दरम्यान, एक वर्ष सात महिन्यानंतर दरवाढ होत असल्याचे जीसीएमएमएफने सांगितले.सोना, ताजा, शक्ती, टी-स्पेशल, तसेच देशातील गाय-म्हशींच्या दुधासारख्या सर्व अमूल दुधाच्या ब्रँडवर आजपासून हे नवे दर लागू होतील.

SBI च्या सर्व्हिस टॅक्समध्ये वाढ:

1 जुलैपासून एसबीआयचे खातेदार एटीएमसह बँकेच्या शाखेमधून सुद्धा चार वेळा विनामुल्य पैसे काढू शकतात. चार पेक्षा अधिक वेळा पैशांची देवाण-घेवाण केल्यास त्यावर 15 रुपये आणि जीएसटी कर लागू होईल. बँकेच्या नव्या नियमानुसार, प्रत्येक वर्षभरात केवळ 10 चेक बुकचा वापर करु शकतो. यापेक्षा अधिक वापर केल्यास त्यावर 40 रुपये आणि जीएसटी कर आकारण्यात येईल. वरिष्ठ नागरिकांसाठी हे नियम लागू होणार नाहीत.

TDS नियमांमध्ये बदल:

ज्या करदात्यांनी मागील 2 वर्षांपासून इन्कम टॅक्स आयटीआर रिटर्न फाईल केले नाही अशा करदात्यांसाठी टीडीएस आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ज्या करदात्यांचा टीडीएस दरवर्षी 50,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, अशांसाठीचा हा नियम लागू होईल.

Syndicate Bank चा IFSC कोड बदलला:

कॅनरा बँकमध्ये विलगीकरण झाल्यानंतर सिंडिकेट बँकेच्या खातेदारांना आजपासून नवीन आयएफएससी कोड वापरावा लागणार आहे. सिंडिकेट बँकेचा आयएफएससी कोड 30 जून 2021 नंतर चालणार नाही. 1 जुलैपासून सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना आपल्या शाखेसाठी नवीन आयफएएससी बँकेचा कोड वापरावा लागणार आहे.

या सर्व गोष्टींचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार आहे. तसंच वाढलेले दर आणि कर यामुळे खर्चाचा बोझा वाढणार आहे हे नक्की.