एकीकडे पेट्रोल-डिझेल, खाद्य तेलांच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. अशात आता त्यांना दुध कंपनीकडून आणखी एक झटका बसला आहे. देशातील एक मोठी दुघ आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादक कंपनी अमूलने (Amul) दुधाची किंमत (Milk Price) वाढवली आहे. अमूल दुधाच्या किंमतीत प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ झाली आहे. या दुधाच्या वाढीव किंमती उद्यापासून म्हणजेच 1 जुलै 2021 पासून अंमलात आणल्या जातील. मिळालेल्या माहितीनुसार देशाची राजधानी दिल्ली, गुजरात आणि पंजाबसह अनेक राज्यात अमूल दुधाचे नवीन दर लागू होतील. कंपनीने आपल्या सर्व ब्रँडमध्ये प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केली आहे.
अशाप्रकारे अमूलची सर्व दुधाची उत्पादने- अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल ताझा, अमूल टी-स्पेशल, अमूल स्लिम आणि ट्रायममध्ये प्रतिलिटर 2 रुपये वाढ होणार आहे. अमूल शक्ती, अमूल गोल्ड आणि अमूल ताझाच्या 500 मिलीलीटर पॅकेटच्या किंमतीत 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यासह आता अमूल गोल्ड 58 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध होईल. अमूल को-ऑपरेटिव्ह सोसायटीने खर्चात वाढ झाल्याने दुधाची किंमत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचे कारण देत इतर काही दूध व्यापाऱ्यांनीही दुधाची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दूध उत्पादक संघाने दुग्धशाळा संचालकांवर दबाव आणण्यासही सुरूवात केली आहे. अमूल ब्रँड नावाने दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणारे जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक आरएस सोधी म्हणाले की, उत्पादन खर्चात वाढ झाल्याने सुमारे एक वर्ष, सात महिन्यांनंतर ही दरवाढ केली जात आहे. (हेही वाचा: महागाईपासून दिलासा! मोदी सरकारकडून 400 वस्तू आणि 80 सेवांवरील GST मध्ये घट, दैनंदिन वस्तू झाल्या स्वस्त)
दुधाच्या किंमतीत वाढ झाल्याने तूप, पनीर, लोणी, चीज, लस्सी आणि ताक याशिवाय चहा, कॉफी, मिठाई, चॉकलेट इत्यादी किंमतीही वाढू शकतात. दरम्यान, अमूल ही भारतातील एक मोठी खाद्य उत्पादक संस्था आहे, ज्यांची 2020-21 मध्ये वार्षिक उलाढाल 39,328 कोटी रुपये आहे. कंपनीने आपल्या ट्विटर बायोमध्ये ही माहिती दिली आहे.