महागाईपासून दिलासा! मोदी सरकारकडून 400 वस्तू आणि 80 सेवांवरील GST मध्ये घट, दैनंदिन वस्तू झाल्या स्वस्त
जीएसटी (Photo Credits: PTI)

वाढत्या महागाईमुळे त्रासलेल्या नागरिकांना केंद्र सरकारने (Central Government) दिलासा दिला आहे. तब्बल 400 वस्तू आणि 80 सेवांवरील जीएसटी (GST) दर कमी करण्यात आला आहे. या वस्तू आणि सेवांवर केंद्र व राज्य यांचा एकत्रित जीएसटी 31 टक्के इतका होता. जीएसीटी दर कमी केल्याने करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून (Ministry of Finance) देण्यात आली आहे.

केसांचे तेल, ट्युथपेस्ट आणि साबण यांसारख्या घरगुती वापराच्या वस्तूंवर जीएसटी येण्यापूर्वी 29.3 टक्के कर आकारला जात होता. जीएसटी नंतर हा कर कमी करुन 18 टक्के करण्यात आला आहे. तसेच व्हॉशिंग मशिन, व्हॉक्युम क्लिनर आणि टीव्ही यांसारख्या घरगुती उपकरणांवर लागणारा कर 31.3 टक्क्यांवरुन 18 टक्के करण्यात आला आहे.

ANI Tweet:

यासोबतच सिनेमा तिकीटांवरील कर देखील कमी करण्यात आला आहे. यापूर्वी हा कर 35 ते 110 टक्के आकारला जात होता. परंतु, आता जीएसटी नंतर 100 रुपयांच्या तिकीटांवर 12 टक्के आणि इतर तिकीटांवर 18 टक्के कर आकारला जाणार आहे. (Black Funguses ची औषध टॅक्स फ्री, कोरोनाच्या लसीवर 5 टक्के GST कायम राहणार)

जीएसटी अंतर्गत कृषी क्षेत्राला पुरेशी सवलत देण्यात आली आहे. खतांच्या बाबतीत जीएसटी निम्मा करण्यात आला आहे. कृषी अवजारांवर कर 15% ते 18% वरून 12% पर्यंत खाली आणण्यात आला आहे. तर काही वस्तूंवर कर 8% वरून 5% करण्यात आला आहे. रासायनिक खतांवर केवळ 5 टक्के कर लागू  आहे.

दरम्यान, देशात 1 जुलै 2017 पासून जीएसटी लागू करण्यात आला आहे. मागील 4 वर्षात जीएसटी दर कमी केला असून नागरिकांवर कराचा बोझा कमी पडावा, यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. तसेच छुप्या करांना कमी करुन आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये स्वदेशी उद्योगांना चालना मिळण्यासाठी बदल करण्यात आल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.