Flight प्रतिकात्मक प्रतिमा (Photo Credit- X)

Pakistan Airspace Closure: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. या भ्याड हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. लोक पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा भारताने पाकिस्तानवरील पकड आणखी घट्ट केली आणि सिंधू पाणी करार रद्द करण्यासह 5 महत्त्वाचे निर्णय घेतले. पाकिस्ताननेही प्रत्युत्तरादाखल 24 एप्रिल रोजी भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद (Pakistan Airspace Closure) केले, ज्यामुळे भारतातील आघाडीची विमान कंपनी इंडिगोच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला.

इंडिगोकडून अधिकृत निवेदन जारी -

एअरलाइनने म्हटले आहे की, पाकिस्तानने अचानक हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. यामुळे आमच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला आहे. कंपनीने कोणते मार्ग प्रभावित झाले आहेत हे स्पष्ट केलेले नसले तरी, पश्चिमेकडे जाणारी उड्डाणे बदलली जाऊ शकतात किंवा त्यांना विलंब होण्याची शक्यता आहे. इंडिगोने प्रवाशांना त्यांच्या फ्लाइटची स्थिती जाणून घेण्यासाठी कंपनीच्या वेबसाइट किंवा कस्टमर केअरशी संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा - Pahalgam Terror Attack: पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे Air India, IndiGo च्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम; निवेदन जारी, दिली प्रवासाचे पुनर्नियोजन आणि परताव्याची सुविधा)

पाकिस्तानकडून हवाई क्षेत्र बंद -

पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद करण्याच्या निर्णयाचा परिणाम केवळ भारतीय विमानांवरच नाही तर इतर देशांच्या विमानांवरही होऊ शकतो. कारण हा परिसर आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांचा एक महत्त्वाचा आणि सोयीस्कर भाग आहे. पाकिस्तानच्या निर्णयाचा भारताच्या देशांतर्गत क्षेत्रांवर परिणाम होणार नाही. परंतु अनेक प्रमुख शहरांमधून युरोप, अफगाणिस्तान, इराण आणि मध्य आशियाला जाणाऱ्या विमानांच्या मार्गावर परिणाम झाला आहे. (हेही वाचा - Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारत रद्द करू शकतो पाकिस्तानसोबतचा युद्धविराम करार; देशाने 'दहशतवाद' नियंत्रणात ठेवण्याचे आश्वासन पाळले नसल्याचा आरोप)

पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यानंतर भारतासमोरील पर्यायी मार्ग -

भारतातील आंतरराष्ट्रीय विमाने (जसे की दिल्लीहून युरोप किंवा अमेरिकेला जाणारी विमाने) पाकिस्तानवरून जातात. जर पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाले तर ही उड्डाणे ओमान किंवा युएई मार्गे अरबी समुद्रावरून जाऊ शकतात. यामुळे उड्डाणाचे अंतर आणि वेळ किंचित वाढतो, परंतु हा एक सुरक्षित आणि व्यावहारिक पर्याय आहे.

इराणवरून पर्यायी मार्ग -

भारत इराण, तुर्कमेनिस्तान आणि कझाकस्तान मार्गे युरोप आणि रशियाला उड्डाणे पाठवू शकतो. यासाठी भारताला संबंधित देशांकडून परवानगी घ्यावी लागेल. हा मार्ग लांब आणि महागडा आहे. परंतु तो एक व्यवहार्य पर्याय आहे.

मध्य आशियाई हवाई मार्ग -

भारत काही विमानांसाठी मध्य आशियाई हवाई मार्गाचा वापर करतो. त्यामुळे या हवाई मार्गाचा देखील भारत वापर करू शकतो.

पाकिस्तान हवाई क्षेत्र बंद झाल्याने काय परिणाम होईल?

मार्ग बदलल्यामुळे उड्डाणांचे अंतर वाढेल. ज्यामुळे विमान कंपन्यांना अतिरिक्त इंधनाची आवश्यकता भासेल आणि प्रवासाचा वेळही वाढेल. यामुळे तिकिटांच्या किमती वाढू शकतात असे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय, विमान कंपन्यांवरील ऑपरेटिंग खर्चाचा ताण वाढेल.