Air India | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताच्या कृतींमुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. यामुळे एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोच्या (IndiGo) आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला आहे. टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडियाने सांगितले की, उत्तर अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि पश्चिम आशियातील त्यांच्या काही उड्डाणे आता लांब मार्गांनी जातील. इंडिगोने म्हटले आहे की, पाकिस्तानच्या हवाई हद्द अचानक बंद झाल्यामुळे त्यांच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला आहे. विमान कंपन्यांनी बाधित प्रवाशांसाठी उड्डाणांचे वेळापत्रक बदलण्याची आणि परतफेड सुविधा जाहीर केल्या आहेत.

इंडिगोने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे आमच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला आहे. आमची टीम सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि प्रवाशांना सर्वोत्तम पर्याय देण्यासाठी काम करत आहे.’ इंडिगो पुढे म्हणाले, ‘ही एक अनपेक्षित परिस्थिती आहे जी आमच्या नियंत्रणाबाहेर आहे. यामुळे तुमच्या प्रवासाच्या वेळापत्रकात गैरसोय झाली आहे याबद्दल आम्हाला वाईट वाटते. जर तुमच्या फ्लाइटवर परिणाम झाला असेल, तर कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या आणि रीबुकिंग किंवा परतफेडचा पर्याय निवडा.’

एअर इंडिया निवेदन- 

पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. पाकिस्तान दहशतवादाला पूर्णपणे आणि कायमचे समर्थन करणे थांबवत नाही तोपर्यंत भारताने 1960 चा सिंधू पाणी करार तात्पुरता स्थगित केला आहे. भारताने अटारी एकात्मिक तपासणी नाका तात्काळ बंद केला आहे. तसेच, सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेले सर्व व्हिसा देखील रद्द करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांना त्यांच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याची परवानगी न देण्याची घोषणा केली. (हेही वाचा: Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानचे वादग्रस्त वक्तव्य; Deputy PM Ishaq Dar यांनी हल्लेखोरांना 'स्वातंत्र्य सैनिक' संबोधले)

इंडिगोचे निवेदन-

दरम्यान, पाकिस्तानच्या हवाई क्षेत्र बंदीमुळे विमान प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. युरोप, उत्तर अमेरिका, आणि मध्य पूर्वेकडील उड्डाणे आता अरबी समुद्र, मुंबई, किंवा गुजरातमार्गे पर्यायी मार्ग घेतात, ज्यामुळे प्रवास वेळ 70-90 मिनिटांनी वाढला आहे. दिल्ली- अल्माटी आणि इतर मध्य आशियाई मार्गावरील काही उड्डाणे रद्द झाली आहेत. वाढलेल्या इंधन खर्चामुळे आणि मर्यादित उपलब्धतेमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे भाडे 8-12% वाढण्याची शक्यता आहे. श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईकडे जाणाऱ्या उड्डाणांच्या भाड्यांमध्येही मागणीमुळे वाढ झाली आहे.