Currency Notes | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Star (*) Symbol Currency Note Legal: चलनी नोटेवर स्टार किंवा फुली अथवा चांदणीसारखे भासणारे * हे चिन्ह असेल तर ती नोट कायदेशीर किंवा अधिकृत आहे का? असा सवाल अनेकांना पडला होता. मात्र, दस्तुरखुद्द केंद्रीय बँकेने म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच याबाबत स्पष्टीकरण दिले असून नागरिकांच्या मनातील चिंता दूर केल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, बॅंकनोटच्या नंबर पॅनलमध्ये हे चिन्ह समाविष्ट केले जाते ज्याचा वापर दोषपूर्ण छापलेल्या नोटांच्या बदली म्हणून केला जातो.

रिझर्व्ह बँकेने एका निवेदनाच्या माध्यमातून म्हटले आहे की, अलिकडेच आमच्या असे लक्षात आले आहे की, स्टार चिन्ह असलेल्या चलनी नोटांबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच त्याच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे आम्ही स्पष्ट करु इच्छितो की, या चलनी नोटा पूर्णपणे वैध आणि कायदेशीर आहेत.

एखाद्या चलनी नोटेवर तारा (*) चिन्ह असले तरी ती नोट इतर कोणत्याही कायदेशीर नोटेसारखीच असते. त्याच्या नंबर पॅनेलमध्ये उपसर्ग आणि अनुक्रमांक यांच्यामध्ये तारा (*) चिन्ह जोडले जाते इतकेच. आरबीआयने म्हटले आहे की, हे चिन्ह एक ओळख आहे की ती बदललेली/पुनर्मुद्रित केलेली बँक नोट आहे.