Citibank: भारत आणि चीनसह 13 देशांमधून सिटी बँक घेणार काढता पाय; 4000 लोकांच्या नोकरीवर गदा, जाणून घ्या कारण
Citibank (Photo Credits: PTI)

अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय बँकिंग आणि वित्तीय सेवा समूह सिटी (Citi Group) ग्रुपने गुरुवारी जाहीर केले की, ते भारत आणि चीनसह 13 देशांमधील कंझ्यूमर बँकिंग बिझनेस (Consumer Operations) बंद करत आहेत. अशाप्रकारे सिटी बँक भारतामधून काढता पाय घेत आहे. जागतिक रणनीतीचा भाग म्हणून बँकेने हे पाऊल उचलले आहे. आता सिटी बँक,  सिंगापूर, हाँगकाँग, लंडन आणि संयुक्त अरब अमिराती या चार देशांमध्ये आपला जागतिक बँकिंग व्यवसाय वाढविणार आहे. विशेषत: जिथे त्यांचा व्यवसाय अल्प प्रमाणात आहे, अशा ठिकाणांहून त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सिटी ग्रुप आता वेल्थ मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रित करेल.

बँकेच्या ग्राहक बँकिंग व्यवसायात क्रेडिट कार्ड्स, रिटेल बँकिंग, गृह कर्जे आणि संपत्ती व्यवस्थापन यांचा समावेश आहे. सिटी ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जेन फ्रेझर म्हणाल्या की, भारत आणि चीनसह 13 देशांमध्ये या समूहाला त्यांच्या योग्यतेचे स्पर्धात्मक काम मिळत नाही. मार्चमध्ये सीईओ बनलेल्या फ्रेझर म्हणाले की, आता समूह वेल्थ मॅनेजमेंटकडे आपला मोर्चा वळवेल, जिथे विकासाची संधी अधिक चांगली आहेत. सिटी ग्रुप ज्या 13 देशांमधून बाहेर पडत आहे त्यापैकी बहुतेक देश आशियामधील आहेत. 2020 मध्ये या देशांमधील या समूहाची उलाढाल 6.5 अब्ज डॉलर्स होती. या देशांमध्ये त्यांच्या 224 रिटेल ब्रांचेस आहेत आणि त्यांच्याकडे 123.9 अब्ज डॉलर्स आहेत.

सिटी ग्रुप समूहाने भारत आणि चीन व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, बहरेन, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, मलेशिया, फिलिपाईन्स, पोलंड, रशिया, तैवान, थायलंड आणि व्हिएतनाममधील बँकिंग कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: केंद्रीय सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतन धारकांसाठी खूषखबर; मोदी सरकारकडून DA, DR benefitsचे संकेत, पगारात 'इतकी' घसघशीत होऊ शकते वाढ)

सिटीबँकच्या भारतामध्ये सुमारे 35 शाखा आहेत. यामध्ये लखनौ, अहमदाबाद, औरंगाबाद, बेंगलुरू, चंदीगड, फरीदाबाद, गुरुग्राम, जयपूर, कोची, कोलकाता, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी दिल्ली, पुणे, हैदराबाद आणि सूरत अशा शहरांच्या शाखांचा समावेश आहे. देशात ग्राहक व्यवसाय बँकिंगमध्ये सुमारे 4 हजार लोक काम करत आहेत व त्यांचे देशात सुमारे 25 लाख ग्राहक आहेत. सिटी बँकने 1902 मध्ये भारतात प्रवेश केला आणि 1985 मध्ये ग्राहक बँकिंग व्यवसायात शिरकाव केला.