CAA: भारतीय नागरिकत्व कसे मिळते? काय आहेत राज्यघटनेतील तरतुदी? वाचा सविस्तर
Indian Citizenship (Photo Credits: File Image)

How Is Indian Citizenship Granted?  म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत केलेल्या नव्या बदलांमुळे, देशभरात अनेक स्तरांवर विरोध दर्शवण्यात येत आहे. बॉलीवूडपासून ते अगदी विद्यार्थ्यांपर्यंत, अनेकजण या कायद्याला विरोध करत निदर्शनं करत आहेत. दिल्ली, आसाम, केरळ, अशा अनेक राज्यात ही निदर्शनं होताना दिसत आहेत. तसेच हा कायदा हा देशाच्या घटनेचा अपमान करतो व धर्मांमध्ये भेदभाव करणारा आहे, असं अनेकांचं मत आहे. त्यामुळेच गूगलवर सध्या CAA हा कायदा म्हणजे सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. इतकंच नव्हे तर या कायद्याला अनुसरून नवनवे ट्रेंड सोशल मीडियावर रोज पाहायला मिळत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे या विरुद्ध झालेल्या आंदोलनांमध्ये आजवर 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

परंतु, भारतीय नागरिकत्व 1955 मधील तरतुदींनुसार नेमकं भारताचं नागरिकत्व कसं मिळवलं जाऊ शकतं याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत.

जाणून घ्या कसं मिळतं भारताचं नागरिकत्व?

1- भारतीय नागरिकत्व 1955 मध्ये असलेल्या पहिल्या तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तीला भारतीय नागरिकत्व हवं असेल तर त्या व्यक्तीने जन्माने भारतीय असणं आवश्यक आहे. भारताची घटना लागू झाल्यापासून म्हणजे 26 जानेवारी 1950 नंतर भारतात जन्म घेतलेली कोणतीही व्यक्ती ही जन्माने भारतीय असेल. 1 जुलै 1987 नंतर या कायद्यात थोडा बदल करण्यात आला व भारतात जन्मलेल्या व्यक्तीच्या जन्माच्यावेळेस त्याची आई किंवा वडिलांपैकी कोणीही एक भारताचे नागरिक असतील तर त्यांना नागरिकत्व मिळते.

2- राज्यघटनेतील दुसऱ्या तरतुदीमध्ये वंश किंवा रक्त संबंधांवर भारतीय नागरिकत्व मिळतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्म जर भारताबाहेर झाला असेल तर त्याच्या जन्माच्यावेळेस त्याच्या आई-वडिलांपैकी कोणीही एक भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. परंतु, त्यासाठी परदेशात जन्मलेल्या बाळाच्या जन्माची नोंद एका वर्षाच्या आत भारतीय दूतावासात करणे आवश्यक आहे अशी अट आहे.

3- तसेच अवैध स्थलांतरीत यांना सोडून कोणतीही व्यक्ती नागरिकत्वासाठी भारत सरकारकडे मागणी करू शकते. परंतु, त्यासाठी पुढील काही अटी आहेत-

A) अर्ज करण्यापूर्वी किमान सात वर्षं भारतात राहिलेली भारतीय वंशाची व्यक्ती

B) पाकिस्तान आणि बांगलादेश वगळता इतर देशांचे नागरिकत्व असणारी व्यक्ती जिला भारताचे नागरिक होण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्या व्यक्तीला दुसऱ्या देशाच्या नागरिकत्वाचा त्याग करावा लागतो.

C) भारतीय नागरिक असलेल्या व्यक्तीशी विवाह झालेली व्यक्ती जी अर्ज करण्यापूर्वी भारतात किमान सात वर्षं राहिली आहे.

D) आई किंवा बाबा यातील एक भारतीय असणारी अल्पवयीन मुले

E) राष्ट्रकुल सदस्य देश यांचे भारतात राहाणारे नागरिक किंवा भारत सरकारची नोकरी करणारे नागरिक

4- राज्यघटनेच्या चौथ्या तरतुदीमध्ये देशाच्या भूमिविस्तार लक्षात घेतला जातो. म्हणजेच भारतात जर एखादा नवा भूभाग सामील झाला तर त्या भागातील राहाणाऱ्या लोकांना भारताचे नागरिकत्व मिळते.

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अर्थात NPR म्हणजे नक्की काय? वाचा सविस्तर

5- तसेच पाचवी तरतूद अशी आहे की नॅचरलायजेशन याचा विचार करणे. याचाच अर्थ भारतात राहाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला नागरिकत्व मिळू शकतं मात्र त्याने नागरिकत्व कायद्याच्या तिसऱ्या अनुसुचीमधील सर्व अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.