भारतात खरंच मे 2020 मध्ये 13 दिवस बॅंका बंद राहणार? जाणून सोशल मीडियातील व्हायरल मेसेज मागील सत्य
Image used for representational purpose (Photo Credit: PTI)

देशभरात 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केल्याने बॅंकेच्या व्यवहारांवर थोडी बंधनं आली आहेत. दरम्यान यामध्ये पहिला 21 दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढे 19 दिवस वाढवला. त्यामुळे 3 मे पर्यंत हा लॉकडाऊन लागू असेल पण 3 मे नंतर काय? याची घोषणा लवकरच सरकारकडून केली जाणार आहे. मात्र नवा महिना म्हणजे पुन्हा महिन्याभराची नवी आर्थिक गणितं. या लॉकडाऊनच्या गोंधळामध्ये सध्या सामान्यांच्या काळजीत भर  घालण्यासाठी   सोशल मीडियामध्ये बॅंकेचे व्यवहार 13 दिवस ठप्प राहणार अशा काही बातम्या फिरत आहेत. मात्र प्रत्येक राज्यानुसार बॅंकेचे व्यवहारांचे वेगळं गणित आहे. त्यामुळे सरसकट भारतामध्ये 13 दिवस बॅंका बंद राहणार नाहीत. जाणून घ्या मे 2020 मध्ये महाराष्ट्रात कोणत्या दिवशी आहेत बॅंक हॉलिडे?

खरंच भारतामध्ये 13 दिवस बॅंक बंद राहणार?

दरम्यान दुसरा आणि चौथा शनिवार सोबत मे 2020 मधील 5 रविवार असे विकेंडला 7 दिवस बॅंक बंद राहणार आहे. यामध्ये काही राज्यांमध्ये कामगार दिवस, बुद्ध पौर्णिमा, रमजान ईद या सणांमुळे बॅंकांना सुट्टी असू शकते. पण हे गणित प्रत्येक राज्यानुसार वेगळं आहे. त्यामुळे तुम्ही भारतामध्ये सध्या ज्या भागात असाल तेथे सुट्ट्यांचे दिवस बदलणार आहे. जसं पश्चिम बंगालमध्ये 8 मेला रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीची सुट्टी आहे. तर जम्मू कश्मिर मध्ये कामगार दिनाची सुट्टी नसेल मात्र 21,22, 25 मे 2020 दिवशी बॅंक बंद राहू शकते. RBI च्या अधिकृत संकेतस्थळावर इथे भेट देऊन तुम्ही तुमच्या शहरात यंदा कोणकोणत्या सणाला सुट्टी असेल आणि बॅंक बंद राहू शकते हे तपासून पाहून त्यानंतरच मे महिन्यात बॅंकेच्या कामांचं नियोजन करा.

तुमच्या शहरातील बॅंक हॉलिडे लिस्ट कशी पहाल? 

  • भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
  • त्यानंतर Regional Office पुढे तुमचं शहर / महिना निवडा.
  • तुम्हांला यामध्ये तारखेनुसार कधी सुट्टी असू शकते आणि त्याचं कारण पाहता येऊ शकतं.

सध्या कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असला तरीही बॅंका बंद ठेवण्यात आलेल्या नाही. देशाचा आर्थिक गाडा सुरळित रहावा म्हणून देशात विशिष्ट वेळेमध्ये आणि मर्यादीत कर्मचार्‍यांच्या उपस्थितीमध्ये बॅंकेचे व्यवहार सुरू ठेवण्यात आले आहेत. यामध्ये लोकांना शक्य असल्यास डिजिटल पेमेंट, ऑनलाईन बॅंकिंग व्यवहार करण्यावर भर द्या असा सल्ला देण्यात आला आहे.