(Photo Credit: Pixabay)

प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षीदेखील गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सुरुवात भाद्रपद चतुर्थीला होते तर अनंत चतुर्दशीला या सणाची सांगता. घरात दहा दिवस गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यास गणपतीचे प्रत्येक घरात आगमन होते असे समजले जाते. या काळात गणपतीची विधीपूर्वक पूजा-अर्चा होते. गणपतीच्या आवडत्या वस्तू त्याला वाहिल्या जातात. रोज सकाळ-संध्याकाळ नैवैद्य दाखविला जातो. गणपतीच्या पूजनाने घरातील वातावरण मंगलमय होते. यावर्षी 13 सप्टेंबरला हा सण सुरु झाला आणि आता 23 सप्टेंबरला गणपतीचे विसर्जन असणार आहे. चला तर जाणून घेऊया या वर्षी काय आहेत बाप्पांच्या विसर्जनाचे मुहूर्त आणि कशी करावी विसर्जनाची पूजा.

गणपती विसर्जन शुभ मुहूर्त (23 सप्टेंबर 2018)

पहिला मुहूर्त- सकाळी 8.00 ते दुपारी 12-30 पर्यंत

दुसरा मुहूर्त- दुपारी 2.00 ते 3.30 पर्यंत

तिसरा मुहूर्त- संध्याकाळी 6.30 ते रात्री 11.00 पर्यंत

अशी करा गणपती विसर्जनाची तयारी

अनंत चतुर्दशीला सकाळी, पहिल्या दिवशी जशी पूजा केली होती तशीच पूजा करा. गणपतीला ताजी फळे, ताजी फुले अर्पण करा. आपल्या कुटुंबासह गणपतीची आरती करून गोडाचा नैवैद्य दाखवा.

विसर्जनासाठी एका स्वच्छ पाटावर गंगाजल शिंपडून तो शुद्ध करा. त्यानंतर घरातील महिलेकडून त्या पाटावर स्वस्तिक चिन्ह काढून घ्या. पाटावर पिवळा, गुलाबी अथवा लाल रंगाचा कपडा अंथरून त्यावर अक्षता ठेवा. पाटावरच फुले वाहून पाटाच्या चारही कोपऱ्यांवर सुपारी ठेवा.

अशा प्रकारे पाट सजवल्यानंतर त्यावर गणपतीची मूर्ती ठेवा. गणपतीला फुल, फळे, दक्षिणा, मोदक अर्पण करा. आणि बाप्पाच्या नावाच्या जयघोषाने गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करा.

नदी अथवा सुमुद्रामध्ये बाप्पांची मूर्ती विसर्जित केली जाते. विसर्जन ठिकाणी पोहोचल्यानंतरही बाप्पांची पुन्हा एकदा आरती करा. बाप्पांना ओवाळून त्यांची मनोभावे प्रार्थना करा. नकळत घडलेल्या चुकांबद्दल माफी मागा. पाच वेळा गणपतीची मूर्ती पाण्यामधून वर खाली करून, मूर्ती पाण्यामध्ये सोडून द्या. लक्षात ठेवा मूर्ती पाण्यात फेकून देऊन नका तर हळूहळू तिचे विसर्जन करा.