Aadhaar Card Update News: 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड बनवलेल्यांना ते आता अपडेट करण्याच्या सूचना; पहा कसं, कुठे कराल?
आधार कार्ड (Photo Credits: File Photo)

UIDAI कडून ज्यांनी दहा वर्षापूर्वी आधार कार्ड (Aadhaar Card ) बनवले आहे पण अजून त्यामध्ये बदल केलेले नाहीत त्यांनी ते अपडेट करावे असं आवाहन केले आहे. UIDAI च्या जारी पत्रकामध्ये सूचना केली आहे की हे अपडेट ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात केले जाऊ शकतात. पण हे बंधनकारक नाही असेही सांगितले आहे.

UIDAI ने ही माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया सशुल्क केली आहे. ज्या व्यक्तींनी दहा वर्षांपूर्वी त्यांचे आधार बनवले आहेत आणि त्यानंतर या वर्षांत कधीही अपडेट केलेले नाहीत, अशा आधार क्रमांक धारकांना दस्तऐवज अपडेट करण्याची विनंती केली आहे. संस्थेने म्हटले आहे की UIDAI ने या संदर्भात आधार धारकांना विहित शुल्कासह दस्तऐवज अपडेट करण्याची सुविधा दिली आहे आणि आधार धारक आधार डेटामध्ये वैयक्तिक ओळख पुरावा आणि पत्ता पुरावा संबंधित कागदपत्रे अपडेट करू शकतात.

या दहा वर्षाच्या कालावधी मध्ये आधार कार्ड नंबरच्या आधारे लोकांनी विविध सरकारी योजनांचा फायदा घेतला आहे. UIDAI ने सांगितले की, या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी लोकांना आधार डेटा मध्ये नव्या वैयक्तिक तपशीलांसह माहिती देणं आवश्यक आहे. यामुळे आधार प्रमाणीकरण आणि पडताळणीमध्ये कोणतीही गैरसोय होणार नाही.