भारतात महिला नेत्यांविरुद्ध (Women Politicians) ट्विटरवर सर्वात जास्त अपमानास्पद भाषा (Abuse On Twitter) वापरी जाते. देशातील महिला नेत्यांच्या प्रोफाइलचा अभ्यास करून, तयार केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. सोशल मीडियावर कोणत्याही विषयाबाबत लोकांना बर्याचदा ट्रोल केले जाते. या ट्रोलिंगच्या प्रकरणात महिला नेत्यांना सर्वाधिक लक्ष्य केले जाते. एजन्सीने देशातील एकूण 95 महिलांचे ट्विटर प्रोफाइल ट्रॅक केले. त्यामध्ये ज्या ट्विटमध्ये महिला नेत्यांची नावे आहेत, अशा 114,716 ट्वीटची चौकशी करण्यात आली, त्यामध्ये ही माहिती समोर आली..
मार्च 2019 ते मे 2019 पर्यंत लोकसभा निवडणुकीच्या आसपास महिला नेत्यांचे ट्विटर अकाउंट ट्रॅक केले गेले. एक आंतरराष्ट्रीय एजन्सी, एमनेस्टी इंटरनॅशनलने (Amnesty International India) हे सर्वेक्षण केले आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर महिला नेत्यांना जास्त लक्ष्य केले जात असल्याचे यातून निदर्शनास आले आहे. यामध्ये स्वतःची मते मांडणाऱ्या महिला राजकारण्यांचा जास्त समावेश आहे. तसेच महिला नेत्यांना त्यांचे लिंग, धर्म, जात, विवाह आणि इतर वैयक्तिक समस्यांबाबतही लक्ष्य केले गेले आहे.
संशोधनातून असे दिसून आले आहे की, यापैकी 13.8 टक्के ट्विटमध्ये महिलांविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरली गेली होती. यामध्ये मुस्लिम महिला नेत्यांना त्यांच्या धर्मामुळे सुमारे 95 टक्के ट्रोलिंग सहन करावे लागले. भाजपमध्ये नसणाऱ्या महिला नेत्यांना जास्त लक्ष्य केले गेले असल्याचे एजन्सीला आढळले आहे. अशाप्रकारे ट्विटरवर ट्रोलिंगची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. अभ्यासानुसार महिला नेत्याला प्रत्येक दिवसाला किमान 100 अपमानास्पद ट्विट येत असल्याचे समोर आले आहे. महिला नेत्यांसाठी ‘Witch’ आणि ‘वेश्या‘ अशा शब्दांचा प्रयोगही केला गेला आहे. (हेही वाचा: किमान 6 महिने न वापरलेली ट्विटर अकाऊंट्स बंद होणार; ई-मेल द्वारा रिमाईंडर पाठवण्यास सुरूवात)
या सर्वेक्षणानंतर ट्विटरने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतातील काही खात्यांवर कारवाई करण्यात आली होती. याशिवाय अनेक प्रकारच्या शब्दांवरही बंदी घालण्यात आली होती. सध्या ट्विटर असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, जिथे कोणालाही अश्लीलतेचा सामना करावा लागत नाही.