Exam (PC - pixabay)

Open Book Exams For Classes 9-12: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने (CBSE) नववी ते बारावीच्या वर्गांसाठी खुले पुस्तक परीक्षा (Open-Book Exams- OBE) घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. याआधीही बोर्डाने इयत्ता 9वी आणि 11वीसाठी म्हणजे तीन वर्षांसाठी ओबीई परीक्षेचा प्रयोग केला होता. हे 2014-15 ते 2016-17 या वर्षात करण्यात आले. बोर्डाने पुन्हा एकदा इयत्ता 9 वी ते 12 वी साठी ओपन बुक एग्झाम घेण्याचा प्रस्ताव आणला आहे. अहवालानुसार, मंडळाला प्रथम काही विशिष्ट शाळांमध्ये या पद्धतीची पायलट रन चालवायची आहे.

इयत्ता नववी आणि दहावीच्या इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयांसाठी ही पायलट रन चालवण्याची योजना आहे. तसेच, इयत्ता 11वी आणि 12वीसाठी इंग्रजी, गणित आणि जीवशास्त्र विषयांसाठीही असेच करण्याची योजना आखली जात आहे.

या पद्धतीच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी तसेच या पद्धतीने चाचणी घेऊन विद्यार्थ्यांना चाचणी पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो हे पाहण्यासाठी पायलट रन केले जात आहे. अंतिम अंमलबजावणीपूर्वी, अशा प्रकारची पद्धत कशी कार्य करेल, ती कार्य करेल की नाही. यामध्ये कोणत्या व्यावहारिक समस्या उद्भवतील इ. बाबीही पहिल्या जातील. याआधी 2014 ते 2017 दरम्यान इयत्ता नववी आणि अकरावीसाठी खुली पुस्तक परीक्षा आयोजित केली होती, तेव्हा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. यंदाच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात काही निवडक शाळांमध्ये या पद्धतीची पायलट रन केली जाण्याची शक्यता आहे.

काय आहे ओपन बुक एग्झाम?

खुल्या पुस्तक परीक्षेत विद्यार्थ्यांना परीक्षेवेळी पुस्तके, नोट्स, संदर्भ साहित्य सोबत ठेवण्याची परवानगी आहे. अशा बाबी विद्यार्थी त्यांच्यासोबत परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाऊ शकतात आणि परीक्षेदरम्यान त्यांच्या मदतीने परीक्षा देऊ शकतात. मात्र विना पुस्तके परीक्षांपेक्षा ओबीई सोप्या असतातच असे नाही, अनेकदा त्या अधिक आव्हानात्मक असतात. ओपन-बुक चाचणी विद्यार्थ्याच्या स्मरणशक्तीचे मूल्यमापन करत नाही, तर विद्यार्थ्याची एखाद्या विषयाची समज आणि संकल्पना विश्लेषित करण्याची किंवा लागू करण्याची क्षमता पहिली जाते. अशा परीक्षांमध्ये केवळ पाठ्यपुस्तकातील मजकूर उत्तर म्हणून लिहून चालत नाही.

दरम्यान, कोविड-19 दरम्यान विद्यार्थ्यांचा विरोध असूनही, दिल्ली विद्यापीठाने ओपन-बुक परीक्षा सुरू केल्या होत्या. किमान संपर्क सुनिश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिका, गॅझेट, अभ्यास साहित्य आणि सॅनिटायझर आणण्यास सांगण्यात आले. सीबीएसईने चार महिन्यांपूर्वी ओपन टेक्स्ट बेस्ड असेसमेंट (OTBA) अंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे साहित्य प्रदान केले होते. त्यांना परीक्षेदरम्यान केस स्टडीसाठी हे अभ्यासक्रम साहित्य घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली होती.