देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घालायला सुरुवात केल्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. या काळात शाळा-कॉलेजेस पूर्णतः बंद आहेत. सरकार सध्या ऑनलाईन शिक्षणावर (Online Education) जोर देत आहे. अशात कोरोना कालावधीत मुलांचा ऑनलाइन शिक्षणामध्ये असलेला रस समोर आला आहे. मुलांच्या हक्कांसाठी काम करणारी सर्वोच्च संस्था नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स (NCPCR) ने म्हटले आहे की, कोरोना कालावधीत भारतातील केवळ 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी स्मार्टफोन वापरत आहेत.
जवळजवळ 60 टक्के मुले फोनचा उपयोग 'इन्स्टंट मेसेजिंग अॅप्स' च्या माध्यमातून गप्पा मारणे, इंटरनेटवर अडल्ट कंटेंट पाहणे इ. साठी करत आहेत. उर्वरित 30 टक्के मुले अद्याप स्मार्टफोन आणि ऑनलाईन वर्गांपासून वंचित आहेत. एनसीपीसीआरने नुकतेच देशभरात यासंदर्भात सर्वेक्षण केले होते आणि त्या आधारे या गोष्टीचा खुलासा झाला आहे. या अभ्यासाच्या अहवालात म्हटले आहे की, सुमारे 59.9 टक्के मुले चॅटिंगसाठी (व्हाट्सएप/फेसबुक/इन्स्टाग्राम/स्नॅपचॅट) आपला स्मार्टफोन/इंटरनेट डिव्हाइस वापरतात.
आश्चर्याची बाब म्हणजे, 10 वर्षांखालील 37.8% मुलांचे स्वतःचे फेसबुक खाते देखील आहे. तर त्याच वयोगटातील 24.3% मुलांचे स्वतःचे स्वतंत्र इंस्टाग्राम खाते आहे. कोरोना कालावधीत 13 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांकडे स्वतःचे स्मार्टफोनचे आले आहेत. मात्र, लॅपटॉप आणि टॅब्लेट वापरणार्या मुलांची संख्या स्थिर आहे. अभ्यासामध्ये म्हटले आहे की यातून असे दिसून आले आहे की पालक आपल्या मुलांना लॅपटॉपऐवजी वेगळा स्मार्टफोन देणे पसंत करतात. (हेही वाचा: Maharashtra Scholarship Exam 2020-21 Revised Date: 5वी, 8वी ची शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऑगस्टला; मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती)
या अभ्यासात एकूण 5,811 लोक सहभागी होते. यामध्ये 3,491 मुले, 1534 पालक, 786 शिक्षक आणि 60 शाळा समाविष्ट आहेत. अभ्यासानुसार, 29.7 टक्के मुलांना असे वाटते की, साथीच्या आजाराचा अत्यंत नकारात्मक परिणाम झाला आहे. त्याचबरोबर, 43.7 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की त्यांच्या शिक्षणावर फारच नकारात्मक परिणाम झाला आहे.