5th,8th Scholarship Exam 2020-21 Date: कोरोना संकटामुळे यंदा सार्या शैक्षणिक वर्षाचे तीन तेरा वाजले आहेत. कोविड 19 च्या संकटामुळे लांबणीवर टाकण्यात आलेली यंदाची 2020-21 ची शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Exam) अखेर 8 ऑगस्ट दिवशी होणार आहे. शालेय शिक्षण विभागाने (Maharashtra State Council of Examination) या प्रलंबित परीक्षेला मंजुरी दिल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ट्वीट करत याची माहिती दि आहे. दरवर्षी 5वी आणि 8वीचे विद्यार्थी ही परीक्षा देतात. यंदा शाळा ऑनलाईन आणि नंतर कोरोनाची दुसरी लाट आल्याने मार्च महिन्यात होणार्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
पाचवी आणि आठवीचे मिळून यंदा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सुमारे 6 लाख 32 हजार 478 विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 5वीचे 3 लाख 88 हजार 335 तर 8 वीचे 2 लाख 44 हजार 143 विद्यार्थी आहेत. यंदा स्कॉलरशीप परीक्षेसाठी 5 हजार 687 केंद्र आहेत. यंदा कोरोनाचा धोका पाहता कडक नियमावलीमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.
वर्षा गायकवाड ट्वीट
सन २०२०-२१ च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून ८ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. परीक्षार्थींना मनापासून शुभेच्छा! #शिष्यवृत्ती pic.twitter.com/sKYUbGolvB
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 20, 2021
यंदाची स्कॉलरशिप परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 25 एप्रिल 2021 रोजी आयोजित केलेली होती मात्र कोरोना वायरस संकटामुळे ती 23 मे दिवशी होणार असे सांगण्यात आले होते पण आता पुन्हा कोरोना संकटामुळे ही परीक्षा पुढे ढकलली. आता अखेर ती 8 ऑगस्टला पुन्हा आयोजित करण्यात आली आहे.
स्कॉलरशीप परीक्षेमध्ये भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा तीन विषयांच्या प्रत्येकी 100 गुणांच्या परीक्षा घेतल्या जातात. त्यानंतर राज्यभरातून अव्वल विद्यार्थ्यांची यादी जाहीर करून स्कॉलरशीप धारकांची यादी जाहीर केली जाते. यामध्ये प्रामुख्याने बहुपर्यायी प्रश्नावली असते. सार्या विषयांच्या परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जातात.मराठी सह 8 भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाते.