Maharashtra Board 10th and 12th Exam 2021 Timetable: दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; HSC परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान, तर SSC परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे पर्यंत
Exam | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

गेले काही दिवस राज्यातील दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षा कधी होणार याबाबत उत्सुकता होती. आता मंडळाने या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक (Maharashtra SSC HSC Exam 2021) जाहीर केले आहे. कोविड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर उदभवलेल्या परिस्थितीमुळे, मंडळाच्या प्रचलित कालावधीमध्ये परीक्षा आयोजित न करता शासन मान्यतेने परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेतील लेखी परीक्षा एप्रिल-मे 2021 मध्ये आयोजित होणार आहेत.

दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा पुढील कालावधीमध्ये होतील.

  • उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (पुनर्रचित व जुना अभ्यासक्रम), शुक्रवार दि. 23 एप्रिल 2021 ते शुक्रवार दि. 21 मे 2021 दरम्यान होतील.
  • माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा गुरुवार दि. 29 एप्रिल 2021 ते बुधवार दि. 20 मे 2021 दरम्यान होणार आहे.

उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेल्या पक्षाचे दिनांकनिहाय सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर, दिनांक 16 फेब्रुवारी 2021 पासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. शाळा/कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विद्याथ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने, एप्रिल-मे 2021 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.

यासोबत मंडळाने विद्यार्थ्यांना काही सूचना दिल्या आहेत. मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल, त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये असे सांगण्यात आले आहे.

तसेच प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा व अन्य विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल. सदर वेळापत्रकांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे दिनांक 23 फेब्रुवारी 2021 अखेर लेखी स्वरूपात पाठवाव्यात. तद्नंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही.