कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे बरेच नुकसान झाले आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी शिक्षण विभाग अनेक उपयोजना राबवत आहे. कोरोनाच्या काळात दहावी-बारावीचे निकाल लागल्यानंतर साधारण 26 जुलैपासून अकरावीची प्रवेश (FYJC Admissions) प्रक्रिया सुरु झाली. ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन चालणार आहे. मात्र अजूनही ही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने अनेक तक्रारी येत आहेत. आता 11 वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या विशेष फेरी अखेर 3,14,569 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे.
याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात, ‘11 वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या विशेष फेरी अखेर अखेर 3,14,569 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. दुसरी विशेष फेरीचे प्रवेश सुरु असून 8 जानेवारी रोजी संपणार आहे. त्यानंतर एफसीएफएस (FCFS) फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!’
११ वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या विशेष फेरी अखेर ३,१४,५६९ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. दुसरी विशेष फेरीचे प्रवेश सुरु असून ८ जानेवारी रोजी संपणार. त्यानंतर एफसीएफएस (FCFS) फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! pic.twitter.com/ByvJmnOBqc
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 6, 2021
यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यात चालणार होती. 3 नियमित फेर्या पार पडल्यानंतरही अनेक विद्यार्थी प्रवेशाविना राहिले होते. त्यामुळे लवकरात लवकर यंदाच्या वर्षाचा अभ्यासक्रम लवकरात लवकर सुरू करावा यासाठी 2 विशेष प्रवेश प्रक्रिया फेर्या पार पडणार आहेत. दुसरी विशेष प्रवेश प्रक्रिया 8 जानेवारी रोजी संपेल. आतापर्यंत सर्वात जास्त 1,86,290 प्रवेश मुंबई विभागात झाले आहेत. त्यानंतर पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती विभगात प्रवेश झाले आहेत. (हेही वाचा: इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा कधी सुरु होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती)
दरम्यान, टाळेबंदीनंतर सर्व जिल्ह्यातील शाळा टप्याटप्याने सुरू करण्यात येत असून ठाणे आणि मुंबई वगळता इतर ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत 9 ते 12 वी गटातील 88 % शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जळगाव येथे या गटातील 100 % शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, तर 90 % किंवा त्यापेक्षा अधिक शाळा सुरू केलेल्या जिल्ह्यांमध्ये 16 जिल्ह्यांचा समावेश आहे.