प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : Youtube)

राज्यात तब्बल 9 वर्षानंतर शिक्षक भरतीस (Teachers Recruitment) प्रारंभ झाला आहे. लोकसभा निवडणुकासाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी इतके वर्षे रखडलेल्या शिक्षक भरतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र निवडणुकांमुळे ही भरती पुढे ढकलण्यात आली, आता या भरतीला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. सध्या राज्यात सरकारी आणि खासगी शाळांमध्ये तब्बल 25 लाख शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मात्र या टप्प्यात फक्त 12 हजार शिक्षकांची भरती होणार आहे. यासाठी सर्व माहिती आणि व्हिडिओ पवित्र पोर्टलवर (Pavitra Portal) उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

उमेदवारांना प्राधान्यक्रम निवडण्यासाठी 31 मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यासाठी गेल्या सहा वर्षांमध्ये 5 सीईटी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. 6 लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, त्यातील 1 लाख 18 हजार उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर अभियोग्यता चाचणीही झाली. आता या सर्वांच्या आधारे पवित्र पोर्टलवी शिक्षकांची भरती होत आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षकांची थेट भरती होणार आहे. खासगी शाळांमध्ये मात्र निवडणूक प्रक्रियेद्वारे भरती पार पडली जाईल. खासगी शिक्षणसंस्थेमध्ये 1 जागेसाठी 10 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. 1 उमेदवार 10 ठिकाणी मुलाखत देऊ शकतो. (हेही वाचा: SBI मध्ये सुरु झाली नोकरभरती; तब्बल 15 लाखापर्यंत मिळणार पगार; जाणून घ्या पदे आणि कुठे कराल अर्ज)

महत्वाच्या तारखा - 

31 मे पर्यंत - प्राधान्यक्रम निवडणे

1 जून ते 10 जून दरम्यान निकाल प्रक्रिया पार पडणार आहे.

10 जून पासून सरकारी शाळांमधील शिक्षकांचे नियुक्तीपत्र दिले जाईल

10 जून ते 16 जून - खासगी संस्थेमधील भरतीसाठी मुलाखती

17 जून पासून थेट शाळांमध्ये रुजू होण्याची संधी

राज्यात सुमारे 7 लाख डीएड आणि बीएड बेरोजगार आहेत. मात्र फक्त 12 हजार पदे भरली जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. तसेच पवित्र पोर्टलवर माहिती भरतानाही अनेक तांत्रिक बाबींचा सामना उमेदवारांना करावा लागत आहे. या तांत्रिक अडचणी दूर करून, प्राधान्यक्रम निवडल्यानंतर शिक्षांची त्वरित नियुक्ती करावी अशी मागणी विद्यार्थी असोशिएशनने केली आहे. राज्यात शेवटची शिक्षक भरती 2008 साली झाली होती, त्यानंतर इतक्या वर्षांनी ही भरती होत असल्याने उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.