Andhra Pradesh Shocking Accident: कार- मोटरसायकलच्या धडकेत दुचाकीस्वार पडला कारच्या  छतावर; चालकाने मृतदेह घेऊन चालवली 18 किमी गाडी
Road Accidents | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Andhra Pradesh Shocking Accident: आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने दुचाकीस्वाराला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीस्वार हवेत उडून कारच्या छतावर पडला. एसयूव्ही चालक मद्यधुंद अवस्थेत होता. तो तरुण आपल्या गाडीच्या छतावरून पडल्याचेही त्याच्या लक्षात आले नाही. या अपघातानंतर (Accident) आरोपीने 18 किलोमीटरपर्यंत तशीच कार चालवली. यावेळी दुचाकीस्वार कारच्या छतावर पडलेला होता. गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील आत्मकुरु मंडलच्या वाय कोट्टापल्लीजवळ राष्ट्रीय महामार्गावर घडली. रविवारी रात्री घडलेली ही घटना गेल्या वर्षी दिल्लीत घडलेल्या अशाच घटनेची आठवण करून देणारी आहे. दिल्लीतील कांझावाला येथे झालेल्या अपघातात कार चालकाने कारखाली अडकलेल्या मुलीला 26 किलोमीटरपर्यंत ओढत नेले होते. त्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. (हेही वाचा - Boat Capsized in Jhelum River : झेलम नदीत बोट उलटल्याने 10 विद्यार्थ्यांसह अनेक जण नदीत बुडले; रेस्क्यू ऑपरेशन सुरू)

अनंतपूर जिल्ह्यातील चोलसमुद्रम गावातील एरीस्वामी असे अपघातात बळी गेलेल्या तरुणाचे नाव आहे. एरीस्वामी हे मेकॅनिकचे काम करायचे. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर तो अनंतपूरला राहत होता, तो रविवारी काही कामानिमित्त सिद्धरामपुरमला गेला होता. रात्री 9.30 च्या सुमारास ते घरी परतत होते. या वेळी कल्याणदुर्गकडे जाणाऱ्या कारने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडकेनंतर एरीस्वामी कारच्या वर पडले. पण कार चालकाच्या लक्षातही न आल्याने तो तसाच गाडी चालवत राहिला. (हेही वाचा - Bihar Accident: गावाला जाताना कारचा अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर )

दरम्यान, कारच्या छतावर मृतदेह पाहून लोक आश्चर्यचकित झाले. त्यानंतर लोकांनी कार थांबवली आणि चालकाला याबाबत सांगितले. लोकांनी पाहिले की कारस्वार खूप मद्यधुंद अवस्थेत होता. मृतदेह उतरविण्याच्या बहाण्याने तो कार सोडून घटनास्थळावरून पळून गेला. ग्रामस्थांच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. ही घटना घडली तेव्हा कारचालक कारमधून एकटाच प्रवास करत होता.