नूरजहाँ (photo Credit : Herald - Dawn)

सन 1947, भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली आणि संपूर्ण हिंदोस्तानची राजकीय, सामाजिक परिस्थिती पूर्ण बदलली. लोकांचे स्थलांतर झाले, कित्येक लोक बेघर झाले आणि कित्येकांचे संसार मोडले. यानंतर दोन्ही राष्ट्र एकमेकांचे शत्रू बनून आग ओकू लागले. त्यावेळी या दोन्ही राष्ट्रांना जोडणारा एकच दुआ होता तो म्हणजे चित्रपट. फाळणीनंतर अनेक कलाकारांचेही स्थलांतर झाले. मात्र ही कला दोन्ही राष्ट्रांत तशीच जिवंत राहिली. त्याकाळात असेच भारतामधून पाकिस्तानमध्ये स्थलांतर झालेले एक नाव म्हणजे नूरजहाँ (Noor Jehan). त्याकाळी नूरजहाँ फक्त एक गायिकाच नव्हती तर ती एक भावना होती. धर्माच्याही पलीकडे जाऊन दोन्ही राष्ट्रांच्या जनतेच्या काळजावर नूरजहाँची बोल कोरले गेले होते. या फाळणीनंतर भारताने पाकिस्तानला फक्त पैशांचीच मदत केली नाही तर, कलाकारांच्या रूपाने अनमोल असे हिरेही बहाल केले. त्यातील नूरजहाँ म्हणजे कोहिनूरच.

तर फाळणीनंतर दोन तीनवेळा नूरजहाँचे पाय भारताच्या जमिनीवर पडले होते. मात्र जाहीररित्या ती कधी जनतेच्या समोरआली नाही. 1982 च्या फेब्रुवारी महिन्यात भारतीय चित्रपट-संगीताच्या सुवर्णमोहत्सवानिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी नूरजहाँला निमंत्रित केले होते. तिकडे नूरजहाँने ते निमंत्रण स्वीकारले आणि इकडे भारतात आनंदाची लाट उसळली. तर तब्बल 35 वर्षानंतर नूरजहाँ प्रेक्षकांसमोर येणार असल्याने तिची एक झलक पाहण्यासाठी आणि तिच्या गाण्याच्या काही ओळी ऐकण्यासाठी भारतीयांचे कान आसुसलेले होते.

नूरजहाँ येणार असल्याची बातमी त्याकाळच्या झाडून सर्व वर्तमानपत्रात छापली होती. शेवटी ती रात्र आली, तिला ऐकण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. मात्र भारतीयांच्या उत्साहावर पाणी पडले,  पाकिस्तानने तिला एकाच अटीवर भारतात पाठवले होते ते म्हणजे भारतात जाऊन गायचे नाही. होय, फक्त आपल्या राजकीय मतभेदांमुळे पाकिस्तानने एका कलाकाराचा इतका  मोठा अपमान केला होता. ज्या नूरजहाँच्या गाण्यावर भारतीय इतके प्रेम करतात ती नूरजहाँ आपली वैयक्तिक संपती आहे असे समजून पाकिस्तानने तिच्यावर चक्क गाणे गायची नाही अशी अट घातली होती.

हे ऐकून तमाम प्रेक्षकांचा हिरमोड झाला, हे म्हणजे अगदी आग्र्याला जाऊन ताजमहाल न पाहण्यासारखे होते. मात्र या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पुढे आले ते दिलीप कुमार आणि नौशाद. आज इतक्या वर्षांनी नूरजहाँ भारतात आली आहे आणि तिचे गाणे ऐकायला मिळणार नाही हा भारतीयांवर अन्यायच आहे. दिलीप कुमार आणि नौशाद यांनी पाकिस्तानला फोन करून जनरल झियांशी संपर्क साधला. त्यांनी पाकिस्तानला विनंती केली, भारतीयांची अवस्था समजून सांगितली, शेवटी पाकिस्तानकडून नूरजहाँला गाण्याची परवानगी घेतलीच. (हेही वाचा: तब्बल १४ वर्षांच्या प्रक्रियेनंतर पडद्यावर अवतरला… पाकीजा !)

त्यावेळी नूरजहाँने ‘अनमोल घडी’ चित्रपटामधील, नौशाद यांचे संगीत असलेले ‘आवाज दे कहाँ हैं, दुनिया मेरी जवाँ हैं’ हे गाणे गायले होते. त्यानातर नौशाद यांच्या विनंतीला मान देऊन ‘मुझसे पहलीसी मुहब्बत मेरे मेहबूब न मांग’ हे पाकिस्तानी गाणेदेखील गायले होते. त्यानंतर श्रोत्यांच्या विनंतीला मान देऊन तिने एक पंजाबी गीतही गायले होते. तर अशाप्रकारे एका कलाकाराने, आवाजाने, गीताने, नूरजहाँच्या फक्त उपस्थितीने त्याकाळी भारत आणि पाकिस्तानमधील हे अंतर साफ मिटवून टाकले होते.