४ फेब्रुवारी १९७२, कमाल अमरोहींचे स्वप्न १४ वर्षांनी पूर्ण होत होते ‘पाकीजा’च्या रूपाने ! होय तब्बल १४ वर्षे हा चित्रपट बनवण्याची प्रक्रिया चालली. कारण मीना पाकीजाच्या रुपात उभी राहिली नसती तर कदाचित पाकीजा बनलाच नसता. शहाजहानने जसा ताजमहाल बनवला अगदी तीच भावना अमरोहीजींच्या मनात पाकीजा बनवताना होती. पाकीजा त्यांचे स्वप्न होते आणि ते त्यांना मीनाला अर्पण करायचे होते.

तर १९५३ मध्ये कमालजींचा ‘दायरा’ सपाटून आपटला, त्यानंतर त्यांच्या डोक्यात जी कथा घोळत होती ती होती पाकीजाची. आपली पत्नी मीना हिलाच डोक्यात ठेऊन त्यांनी हा चित्रपट लिहिला. ज्या वेळी चित्रपटाची प्रक्रिया सुरु झाली त्यावेळी कमाल आणि मीना हे ‘दो जिस्म एक जान’ होते, मात्र ज्यावेळी चित्रपट बनून पूर्ण झाला, त्यावेळी दोघांच्या नात्याचा अंत होऊन दोघांनीही आपापले वेगळे रस्ते निवडले होते.

१९५८ मध्ये पाकीजाची पहिली वीट रोविली गेली. पाकीजा अर्थातच मीना होती तर अशोक कुमार यांना नायकाची भूमिका देण्यात आली होती. संगीताची जबाबदारी होती गुलाम मोहम्मद यांच्यावर तर कैफी आझमी, मजरूह गीते लिहिणार होते. आणि या भव्य चित्रपटाचे बजेट होते तब्बल दीड करोड रुपये !

चित्रपट कृष्णधवल होता मात्र काही काळानंतर जेव्हा रंगीत चित्रपट बनण्याचे तंत्रज्ञान भारतात आले तेव्हा आधी शूट झालेले सिन्स रद्द करून अमरोहींना चित्रपटात रंग भरायचे होते. त्यांनी ते तंत्रज्ञान मागवून घेतले मात्र त्यात काही तांत्रिक समस्या उद्भवल्या त्यामुळे त्यांना काही काळ थांबावे लागले.

याच काळात कमाल आणि मीना यांमधील संबंध बिघडत चालले होते. प्रत्येक वेळी कमालजींचा ‘मेल इगो’ आडवा येऊ लागला होता, त्यांनी मीनाच्या वैयक्तिक आयुष्यावरही अनेक बंधने घातली होती. त्यांना मीनाचा पती म्हणून राहायचे नव्हते तर तिला स्वतःची पत्नी बनवून ठेवायचे होती. याचीच परिणीती १९६४मध्ये दोघांचे नाते संपुष्टात येण्यात झाली. मीना कमालजींच्या आयुष्यातून निघून गेली होती, त्यामुळे आता चित्रपटाच्या भविष्याबद्दल फार मोठी चिंता कमालजींना होती. त्यांनी २४ ऑगस्ट १९६८ मध्ये मीनाला पत्र लिहिले, त्या पत्रात त्यांनी पाकीजा पूर्ण करण्याची मागणी केली. कमालजींसाठी पाकीजा बनवणे किती महत्वाचे आहे हे मीनाला चांगलेच ठाऊक होते, पतीच्या या स्वप्नाची तिला पूर्ण जाणीव होती. त्यामुळे दोघे विभक्त झाल्यावरही आणि आजाराने ग्रस्त असतानाही तिने तो चित्रपट पूर्ण करण्यास होकार दिला. कुठेतरी तिच्या मनात कमालजींची ती जागा तशीच रिक्त होती.

तर १६ जुलै १९५६ मध्ये मजरूह लिखित 'इन्हीं लोगों ने...’ या मुजऱ्याला कमालजींनी कॅमेरामध्ये कैद केले होते. त्यानंतर आज १९६९ मध्ये इतक्या वर्षांनी पाकीजा पुन्हा आकार घेऊ लागला होता. कमाल परिपूर्णतावादी होते, त्यामुळे त्यांच्या डोक्यात जसे आहे तसेच पाकीजाचे चित्र त्यांना पडद्यावर चितारायचे होते. मात्र यादरम्यान दोन महत्वाच्या दुखःद गोष्टी घडल्या होत्या, एक तर अशोक कुमार यांचे वय वाढल्यामुळे ते नायकाची भूमिका करू शकत नव्हते त्यामुळे नंतर धर्मेंद्र यांना तो रोल देण्यात आला. मात्र त्याचवेळी धर्मेंद्रे आणि मीना यांचे प्रेम परवान चढत होते, ते पाहून कामालाजींनी तो रोल राज कुमार यांना दिला. याच दरम्यान गुलाम साहेबांचे निधनही झाले त्यामुळे पार्श्वसंगीताची जबाबदारी देण्यात आली नौशाद यांना. सेट, कपडे, संगीत, मुजरे, शायरी, गीते, लोकेशन्स सर्व काही कामालाजींच्या मनास जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत ते कामाला सुरुवात करणार नव्हते. ते स्वतः आधी सर्व लोकेशन्स आणि शॉट्सची चित्रे कागदावर काढत असत आणि त्याचप्रमाणे सिन्स चित्रित होत असत. त्यावेळी मीनाजींचा आजारही वाढत चालला होता अशा परिस्थितीत कमाल यांनी लोकेशन्स शोधण्यासाठी आख्खा भारत पालथा घातला होता. उत्तर प्रदेशमध्ये कामालाजींची जशी हवेली होती तशीच हवेली त्यांनी मुंबई मध्ये उभारली तर चित्रपटाचे अनेक समान बेल्जियममधून मागवले.

पाकीझा हा रंगीत सिनेमास्कोपमध्ये बनलेला भारतातीत पहिला चित्रपट होय. १९६९ मध्ये चित्रपटाचे पहिले गाणे शूट झाले, ते होते ‘मौसम है आशिकाना...’ आणि गाण्यात भारतात पहिल्यांदा चित्रपटाची नायिका लुंगी मध्ये दिसली होती (कारण मीनाला पोटदुखीचा त्रास होत असल्याने कामालाजींनी मुद्दाम त्यांना लुंगी नव्या ढंगात वापरायची परवानगी दिली). ‘चलो दिलदार चलो..’ गाणे शूट झाले मात्र आजारामुळे मीनाजींचा चेहरा फार त्रस्त दिसत होता, त्यामुळे कामाजींनी ते गाणे पुन्हा असे रिशूट केले की, ज्यामध्ये मीनाजींचा चेहरा दिसणार नाही. हीच गोष्ट ‘तीर-ए-नजर..’ गाण्याची, जिथे मीनाजींच्या चेहऱ्याचे शॉट्स सोडून संपूर्ण गाणे पद्मा खन्ना यांच्यावर चित्रित झाले. मीना कुमारी यांच्या डाव्या हाताची दोन बोटे अपघातात कापली गेली होती मात्र ती लपवून फक्त उजव्या हाताचा उपयोग त्यांनी अगदी शिताफीने केला आहे की ही गोष्ट लक्षातही येत नाही. अशा अनेक गोष्टी कामालाजींना कराव्या लागल्या मात्र चित्रपटात अशा गोष्टींची सावलीही दिसत नाही.

चित्रपटासाठी एकूण तब्बल १९ गाणी चित्रित केली गेली होती, मात्र त्यापैकी १० गाण्याचा चित्रपटामध्ये वापर केला गेला. उर्वरीत गाणी ‘पाकीजा-रंग बेरंग’ या अल्बम अंतर्गत१९७७ मध्ये प्रसिद्ध केली गेली (ज्यामध्ये मीनाने गायलेल्या गाण्याचाही समावेश आहे). गाण्यासाठी लता मंगेशकर, वाणी जयराम, परवीन सुलताना, राजकुमारी, सुमन कल्याणपूर, शमशाद बेगम, शोभा गुर्टू आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजाचा वापर करण्यात आला.

१९७२ मध्ये चित्रपटाला ५ नॉमिनेशन्स मिळाले होते मात्र फक्त कला दिग्दर्शनासाठी चित्रपटाला पुरस्कार मिळाला. जेव्हा संगीताचा फिल्मफेअर पुरस्कार शंकर-जयकिशन यांना मिळाला, त्यावेळी प्राण यांनी त्यांचा फिल्मफेअर परत केला कारण त्यांच्या मते गुलाम साहेबच उत्कृष्ट संगीताच्या पुरस्काराचे खरे मानकरी आहेत.

चित्रपट प्रदर्शित झाला, आणि मीना कुमारच्या अभिनयाने लोकांना भुरळ पाडली, राजकुमारच्या संवादाचे लोक दिवाने झाले, लोकांनी गाणी डोक्यावर घेतली, ज्याच्या त्याच्या ओठी कमाल अमरोहींचे नाव होते मात्र यात मीना कुमारी कुठेच नव्हती, कारण त्यावेळी ती आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काहीच आठवड्यांतच म्हणजे ३१ मार्च १९७२ ला स्वतःचे अस्तित्व चित्रपट, कवितांच्या रूपाने मागे ठेऊन मीना कुमारीने या जगाचा निरोप घेतला, मात्र पाकीजाच्या रूपाने ती अजरामर झाली.

“मीना शराब पीती थी मजलिस में बैठकर

पाकीजा बन गई तो खुदा ने उठा लिया...”