Sur Nava Dhyas Nava (File Image)

कलेला वयाची मर्यादा नसते असे म्हणतात, या सूत्राला घेऊन कलर्स मराठी पुन्हा एकदा घेऊन आला आहे प्रेक्षकांचा आवडता चैतन्यपूर्ण गाण्यांचा सांगीतिक कार्यक्रम ज्याच्या पहिल्या दोन्ही पर्वांनी प्रत्येक मराठी माणसाचे मन जिंकले “Sur Nava Dhyas Nava – स्वप्न सूरांचे, स्वप्न सार्‍यांचे”.

कार्यक्रमाचा रंगमंच सूर आणि ताल यांनी पुन्हा बहरताना पाहायला मिळणार आहे व त्याचसोबतीने संगीत मैफलीचा अनुभव रसिकांना विविध वयोगटातील सुरवीर देताना दिसतील. स्वप्नांना वयाची अट नसणार कारण या पर्वाचे वैशिष्ट्यच आहे ५ ते ५५ वयोगटातील सुरवीर या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन सुरवीर शोधून काढले आणि यामध्ये निवड झालेल्या स्पर्धकांमध्ये मेगा ऑडिशनची फेरी पार पडली. त्यामधून २२ सुरवीरांची निवड झाली आहे. आता महाराष्ट्रातील या २२ सुरवीरांचा सुरेल प्रवास सुरू झाला आहे. मागील पर्वाप्रमाणेच महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर या सुरवीरांची पारख करण्यासाठी, त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्यासोबत असणार आहेत- आपल्या स्वरांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे महेश काळे (Mahesh Kale), अष्टपैलू अदाकार अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte). या पर्वाचा ध्यास देखील उत्तमातून उत्तम सुर शोधणे हाच असणार आहे.

कार्यक्रमाविषयी बोलताना महेश काळे म्हणाले, “कार्यक्रमामध्ये ५ ते ५५ हा वयोगट असल्यामुळे आपल्याला बर्‍याच वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील कारण यामध्ये उत्सुफुर्ततेची स्पर्धा आहे संयमासोबत आणि ऊर्जेची स्पर्धा आहे परिपक्वतेसोबत आणि म्हणूनच आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी अनुभवाला मिळणार आहेत. लोकांच्या गाण्यासोबत हळहळू त्यांचे आयुष्यदेखील उलघडत जाईल. यामुळेच हे पर्व धमाकेदार असणार आहे आस वाटत आहे”.

कलर्स मराठीच्या कुटुंबाचाच भाग असलेले अवधूत गुप्ते म्हणाले, “गेल्या इतक्या वर्षांपासून सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे आणि म्हणूनच याचवेळेस कलर्स मराठीने एक आगळीवेगळी थीम घेऊन पुढचे पाऊल उचलेले आहे. मला नाही वाटत अश्या प्रकारचा वयोगट, अशाप्रकारची थीम याआधी मराठीच नव्हे तर भारतातील कुठल्या वाहिनीवर झाली असेल... हे खूप छान आणि उत्साहवर्धक आहे कारण मला असे वाटत संगीताला वय नसते, त्यामुळेच आपण कधीतरी वयापलीकडे जाऊन बघायला हवं. या पर्वामध्ये खरतर आमचीच परीक्षा असणार आहे कारण जेंव्हा सात वर्षाची मुलगी आणि ४० वर्षाचा माणूस गाण सादर करेल तेंव्हा त्या दोघांना गुण द्यायचे आहेत. मी असे म्हणणे आतापर्यंत जर आम्ही व्यक्तींना गुण दिले असतील तर आता आम्ही गाण्याला गुण देणार आहोत. त्याक्षणी कोणत्या स्पर्धकाचे गाणे आनंद देऊन गेले या गोष्टीला गुण देणे म्हणजेच माणसाला त्याच्या वयाच्या पलीकडे जाऊन त्याच्या गाण्यावरून गुण देणे हे एक आव्हान आहे जे मी आणि महेश मिळून यावेळेस पार पडणार आहोत”.