श्रीयुत गंगाधर टिपरे, गोट्या, दे धम्माल.. Coronavirus Lockdown मधील वेळेत 90 च्या दशकात टेलिव्हिजन वर धुमाकूळ घालणार्‍या या मालिका पुन्हा मिळाल्या तर जरूर बघा!
Marathi Serials | Photo Credits: Youtube

भारतामध्ये 24 मार्च पासून लॉकडाऊन जाहीर झाला आणि सारे जग थांबलं. याचा मनोरंजन क्षेत्रदेखील अपवाद नाही. मागील दोन महिन्यांपासून शूटिंग थांबल्याने मालिका रखडल्या आहेत. त्यामुळे टेलिव्हिजनवर या लॉकडाऊनच्या काळात रामानंद सागर निर्मित रामायण, उत्तर रामायण आणि श्रीकृष्ण या मालिकांचं पुन्हा प्रक्षेपण सुरू करण्यात आलं आहे. या मालिकांसोबतच दूरदर्शनवर महाभारत, बुनियाद, श्रीमान श्रीमती, शक्तिमान अशा मालिकांचं पुन्हा प्रसारण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता लवकरच लॉकडाऊन 4 ची देखील घोषणा होणार आहे. त्यामुळे ऑनलाईन वेबसीरीजचं बिंज वॉचिंग करून कंटाळा आला असेल तर तुमच्या बालपणीत पुन्हा जाऊन बघा. लहानपणी रविवारच्या सुट्टीला किंवा सकाळी शाळेत जाण्यापूर्वी मराठी चॅनेलवर तुम्ही काय बघत होतात?

90च्या दशकात दूरदर्शनच्या सह्याद्री चॅनल सोबत काही खाजगी वाहिन्यादेखील सुरू झाल्या होत्या. त्यामुळे लहान मुलांसाठी बोक्य सातबंडे, गोट्या पासून दे धम्मालची धूम होती. तर सगळ्या कुटुंबाला एकत्र बांधणार्‍या हलक्या फुलक्या मराठी मालिकांनी देखील याच काळात पाय रोवले. त्यापैकीचा काही मालिका तुम्हांला आता या लॉकडाऊनच्या काळात नॉस्टॅल्जिक करत असतील तर जरूर आता ऑनलाईनवर, युट्युबवर किंवा चॅनल्सच्या अ‍ॅपवर या जुन्या मालिका पुन्हा पाहणं देखील गंमतीशीर असेल.

श्रीयुत गंगाधर टिपरे

केदार शिंदे दिग्दर्शित श्रीयुत गंगाधर टिपरे मालिका आजही मराठी रसिकांच्या मनामनात आहे. या मालिकेत दिलीप प्रभावळकरांनी साकारलेले "आबा"असतील किंवा सतत कुटुंबासाठी घाई गडबडीत असणारी सामान्य गृहिणी 'शामला' असो. या मालिकेने सामान्य माणसाचं आयुष्य टेलिव्हिजनवर आणताना गंमती जमतींसोबत दु:ख देखील मांडली होती.

दे धम्माल

तुमचं बालपण 90 च्या दशकातलं असेल तर क्वचितच असं झालं असेल की तुम्ही

दे धम्माल मालिका नसेल बघितली. झंप्या आणि त्याच्या गॅंगची धुमाकूळ बघतच अनेकांच्या रविवारची सुरूवात झाली असेल.

गोट्या

ना.धों. ताम्हनकर यांनी लिहिलेल्या गोट्या या मराठी कादंबरीवरच आधारित ही मालिका होती. ३० वर्षांपूर्वी मुंबई दूरदर्शनवर लोकप्रियता मिळवलेल्या या मालिकेने त्यावेळेस लहान मुलांसह मोठ्यांनाही टीव्हीसमोर खिळवून ठेवले होते. या मालिकेच टायटल ट्रक देखील ऐकून तुम्ही नॉस्टॅलजिक नाही झालात तरच नवलं!

बोक्या सातबंडे

बोक्या सातबंडे म्हणजेच चिन्मयानंद नावच्या 7-8 वर्षाच्या मस्तीखोर मुलाची कहाणी. सामान्य घरात राहणार्‍या 3 पिढ्यांचा लाडका बोक्या रोज काय करामती करतो? हे पाहण्यात रसिक कधी दंग व्हायचे हे समजलंही नसेल. अनेकदा या मालिकेचे भाग पाहून पालकच अंर्तमुख झाले असतील. विनय आपटे दिग्दर्शित या मालिकेने अनेक वर्ष मराठी मालिकांच्या मनावर राज्य केलं आहे.

Akshaya Deodhar Birthday Special: अंजली पाठक बाईंबद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी - Watch Video 

‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’

मध्यमवर्गातिल माणसाचं आयुष्य टेलिव्हिजन मांडणार्‍या मजेशीर मालिकांमध्ये ‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’चा समावेश होतो. आयुष्यातल्या सुखदु:खाला थेट हात घालणारी ही मालिका सुपरडुपर हीट होती. नेहमीच्या आयुष्यातल्या घडामोडींना नाट्यमय वळण देत त्याची मांडणी केली होती. चाळीतल्या अडचणी, अनेक नेमके प्रसंग अशा माध्यमातून मध्यमवर्गीय आयुष्य छोटय़ा पडद्यावर उलडलं होतं.

दूरदर्शनवर पूर्वी विशिष्ट भागांची मालिका अशीच सिरीज होती. अनेक लोकप्रिय मालिका या केवळ 13 भागांच्या होत्या. आणि भाग जरी वाढवले तरी ते 13 च्या पटीमध्येच वाढवले जात असे. यामध्ये मराठी साहित्य विश्वातील अनेक दिग्गज लेखकांचा समावेश होता. पुस्तक स्वरूपातील अनेक साहित्यकृतींना या वेळेस मालिकेच्या मध्यमातून वेगळं वलय मिळालं होतं.