विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. राज्यामधील वातावरण तापत आहे. राजकारण हा विषय अनेक लेखकांचा आणि चित्रपटसृष्टीचा देखील आवडीचा विषय. कारण राजकीय पार्श्वभूमी असलेली कथा म्हटली, की अनेक पात्रांची पेरणी करण्याचं आंदण उपलब्ध होत असतं. अनेक प्रकारची पुस्तकं, अनेक प्रकारच्या भाषांमध्ये ह्या विषयावर लिहिली गेलेली आहेत . १०० वर्षांच्या भारतीय चित्रपटसृष्ट्टीत अनेक राजकीय चित्रपट आले-गेले. ग्रामीण, शहरी, गंभीर, विनोदी अनेक बाजांचे आणि अनेक ढंगांचे. त्यातील काही चित्रपट असे होते, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला.
1. सामना
1974 साली आलेला हा चित्रपट काळाच्या बराच पुढचा असा होता. जब्बार पटेल ह्यांच दिग्दर्शन आणि श्रीराम लागू , मोहन आगाशे , निळू फुले , स्मिता पाटील अशा मातब्बर कलाकारांचा ताफा असलेला हा चित्रपट त्या काळी प्रचंड चालला. मारुती कांबळेच्या खुनाचा मास्तरने केलेला पाठपुरावा आणि लावलेला छडा आणि हिंदूरावाला त्याच्या गुन्ह्याची द्यायला लावलेली कबुली, हे सगळंच प्रेक्षकांनी उचलून धरलं .
2. सिंहासन
जब्बार पटेल , श्रीराम लागू आणि निळू फुले या त्रयीचा 1979 साली प्रदर्शित झालेला हा दुसरा चित्रपट. मोहन आगाशे , रीमा लागू, अरुण सरनाईक, सतीश दुभाषी ह्या दिग्गजांची त्यांना लाभलेली साथ. दिगू टिपणीस या पत्रकाराचा एका प्रामाणिक पत्रकारापासून ते व्यवस्थेला शरण गेलेला आणि नंतर व्यवस्थेचा एक भाग झालेला एक इसम हा प्रवास ह्या चित्रपट उत्तमरीत्या मांडला आहे. 'सिंहासन' तसेच 'मुंबई दिनांक' ह्या अरुण साधूंच्या पुस्तकावरून हा चित्रपट घेतलेला होता .
3. वजीर
1994 साली आलेल्या ह्या चित्रपटाचा विषयसुद्धा राजकीयच होता. आशुतोष गोवारीकर , अश्विनी भावे , विक्रम गोखले आणि अशोक सराफ ह्यांसारखी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना भावला.
उज्ज्वल ठेंगडी ह्यांचा दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटात अशोक सराफ ह्यांनी खलनायकाची भूमिका बजावली होती.
4. झेंडा
2010 साली आलेल्या ह्या चित्रपटाने खरे तर प्रदर्शनाच्या वेळी वादंग उठवले होते. ठाकरे घराण्यावर बेतलेल्या ह्या चित्रपटामुळे उद्धव विरुद्ध राज ह्या वादाला पुन्हा तोंड फुटले होते. पण त्याचा काहीसा फायदा चित्रपटाला झाला असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटही चांगला असल्या कारणाने प्रेक्षकांनी ह्या चित्रपटाला उचलून धरले. संगीतकार अवधूत गुप्ते ह्यांनी चित्रपट दिग्दर्शनात ह्या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते .
5. देऊळ
खरे तर 2011 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट पूर्णतः राजकीय असा चित्रपट म्हणता येणार नाही . कारण मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे हा चित्रपट अधोरेखित करतो. दत्ताची मूर्ती सापडल्यानंतर होणारं राजकारण, एक माणूस म्हणून विचार करण्यास भाग पाडतं. उमेश कुलकर्णीने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटाला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट , तर गिरीश कुलकर्णीला सर्वोत्कृष्ट संवाद आणि अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता.