laxmikant berde (picture credit: swanandi berde instagram)

महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांची आज जयंती. संबंध महाराष्ट्राला हसवून वेडं करणाऱ्या ह्या लाडक्या लक्ष्याच्या काही गाजलेल्या चित्रपटांवर आपण नजर टाकू.

1. अशी ही बनवा बनवी (Ashi Hi Banva Banvi)

1988 साली आलेला हा चित्रपट. आजही प्रेक्षकांच्या मनावर या चित्रपटाचं गारुड आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर यासारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने धमाल उडवून देणारा हा सिनेमा. 'धनंजय माने इथेच राहतात का?' हा प्रसंग आजही बघितल्यानंतर तेवढंच हसू येतं. आज या चित्रपटाला 'कल्ट' स्टेटस प्राप्त झालेलं आहे. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडगोळीने दिलेल्या असंख्य हिट चित्रपटांपैकी हा सर्वात वरचा असेल.

2. हमाल दे धमाल (Hamaal De Dhamaal)

लक्षाचे बंधू पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. एका हमालापासून ते चित्रपटातील एक सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास, त्या प्रवासात यणाऱ्या अडचणी, मजा मस्ती म्हणजे हमाल ते धमाल. हा चित्रपट आला आणि ह्यातील एका गाण्याने जे महाराष्ट्राला वेड लावलंय ते अजूनही प्रेक्षकांच्या डोक्यावरून उतरलेलं नाहीये. 'एक, दोन, तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार, गोविंदा रे गोपाळा' हे गाणं वाजल्याशिवाय अजूनही गोकुळाष्टमी पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही.

3. झपाटलेला (Zapatlela)

महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे ह्या जोडीने मराठी चित्रपट रसिकाला असंख्य आठवणींनी बांधून टाकलंय. धूमधडाका पासून सुरु झालेला यांचा धडाका अगदी पछाडलेला पर्यंत कायम होता. झपाटलेला हा त्यातला एक कलगी तुरा. 'ओम फट स्वाहा' करणाऱ्या तात्या विंचूने त्या वेळी महाराष्ट्राला प्रचंड घाबरावलंही होतं, आणि वेडंही केलं होतं. हा तात्या विंचू मागे लागल्यानंतर उडणारी तारांबळ लक्षाने कमाल दाखवली होती. (हेही वाचा. Colors Marathi Awards 2019: कलर्स मराठी अवॉर्ड्सच्या पहिल्या वर्षात कोण कोण ठरले पुरस्काराचे मानकरी?)

4. एक होता विदूषक (Ek Hota Vidushak)

लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे फक्त कॉमेडी या गैरसमजाला छेद देणारा चित्रपट म्हणजे 'एक होता विदूषक.' जब्बार पटेल यांचं दिग्दर्शन तर संवाद पु.ल. देशपांडे यांचे. या चित्रपटात लक्षाने साकारलेल्या विदूषकाच्या काहीशा वेगळ्या धाटणीच्या भूमिकेचं फार कौतुक झालं. या चित्रपटाला अनेक राज्य शासनाचे पुरस्कार तर मिळालेच. पण सोबतच सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

5. पछाडलेला (Pachadlela)

हा चित्रपट लक्ष्मीकांत बेर्डे यांचा शेवटचा चित्रपट. या चित्रपटात भरत जाधव जरी मुख्य भूमिकेत असला, तरीही लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेला मांत्रिकही तेवढाच लक्षात राहण्यासारखा आहे. भूमिकेची लांबी तुलनेने कमी असली तरीही त्या भूमिकेचं चित्रपटातलं महत्व मोठं आहे. या चित्रपटाच्या वेळी तब्येतीने ग्रासलं असतानासुद्धा त्यांनी धमाल उडवून दिलेली आहे.