झपाटलेला (Zapatlela) सिनेमात 'बाबा चमत्कार' ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ (Raghavendra Kadkol) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 83 व्या वर्षी पुण्यातील (Pune) राहत्या घरी आज सायंकाळी 4 वाजता त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्यांनी अनेक मराठी सिनेमे, नाटक, मालिकांमधून काम करत आपल्या अभियनाची छाप सोडली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. अभिनयासोबत ते उत्कृष्ट लेखनही करत असतं.
अभिनयासोबत ते उत्कृष्ट लेखनही करत असतं. कृष्णधवल सिनेमातून त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकीर्दीला सुरुवात झाली. वडीलांच्या अकाली निधनामुळे खांद्यावर पडलेली कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांनी जंगल खात्यात टायपिस्ट म्हणून नोकरीही केली. त्याचबरोबर सिनेसृष्टीतील पडेल ते काम करत त्यांनी कामाप्रती आपली निष्ठा दाखवून दिली. करायला गेलो एक या व्यावसायिक नाटकातून त्यांना ब्रेक मिळाला. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून पूर्णपणे कला क्षेत्रात स्वत:ला झोकून दिले. अश्रूंची झाली फुले, रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकांमध्ये त्यांनी काम केले. गौरी, सखी, कुठे शोधू मी तिला, ब्लॅक अँड व्हाईट या सिनेमातही त्यांनी भूमिका साकारल्या. मात्र झपाटलेला सिनेमातील बाबा चमत्कार ही त्यांची भूमिका विशेष गाजली. गोल्ड मेडल नावाचे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे.
दरम्यान, बालगंधर्व परिवारातर्फे राघवेंद्र कडकोळ यांना जीवनगौरव पुरस्कारही देण्यात आला होता. त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेकडून नटवर्य केशवराव दाते पुरस्कारने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.