Dilip Kumar Birthday Special : एक काळ होता, जेव्हा फक्त त्यांच्या नावामुळे चित्रपटावर लोकांच्या उड्या पडायच्या, त्यांना डोळ्यासमोर ठेऊन गाणी लिहिली जायची, त्यांच्या अभिनयासमोर भल्या भल्यांचा थरकाप उडायचा, अशी क्वचित एखादी अभिनेत्री असेल जिने त्यांच्यासोबत काम केले नसेल अशा या भारतीय चित्रपटसृष्टीच्या कोहिनूरचा, ट्रॅजेडी किंग दिलीप कुमारचा आज (11 डिसेंबर) 96 वा जन्मदिवस. फक्त 54 चित्रपटांमध्ये काम केलेले दिलीप कुमार जवळजवळ 1970 पर्यंत हिंदी चित्रपटांमधील सर्वात आघाडीचे नेते होते. सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी तब्बल 10 फिल्मफेअर मिळवणाऱ्या दिलीप कुमार यांच्या नावावर सर्वात जास्त पुरस्कार मिळवणारा भारतीय अभिनेता असा गिनीज रेकॉर्ड (Guinness World Records) आहे, यावरूनच त्यांच्या अभिनयाचा अंदाज येतो.
> दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 साली पेशावर (पाकिस्तान) येथे झाला. त्यांचे खर नाव युसुफ खान होय. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. देविका राणी (Devika Rani)च्या कंपनीने 1250 रुपये महिना पगारावर दिलीप कुमार यांना करारबद्ध केले. लेखक भगवतीचरण वर्मा यांनी त्यांचे नाव दिलीप कुमार ठेवले आणि 1944 साली प्रदर्शित झालेला ‘ज्वार भाटा’ हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला.
> दिलीप कुमार यांना खरी ओळख मिळाली ती 1947 मध्ये आलेल्या ‘जुगनू’ चित्रपटामुळे. त्यानंतर आलेल्या ‘जोगन’, ‘दीदार’ आणि ‘त्यागी’ या चित्रपटांनी त्यांना ट्रॅजेडी किंग म्हणून ओळख दिली.
> तराना (Tarana) या 1951 सालच्या चित्रपटावेळी दिलीप कुमार मधुबालाच्या प्रेमात पडले. हे नाते तब्बल सात वर्षे टिकले. त्यानंतर ‘नया दौर’च्या कोर्ट केस वेळी या नात्याला तडा गेला आणि हे नाते तुटले. मुगल-ए-आझम (Mughal-e-Azam) नंतर या दोघांनी परत एकत्र कधीच काम केले नाही.
> 1966 साली दिलीप कुमार यांनी 22 वर्षे लहान सायरा बानूशी लग्न केले. तुम्हाला माहित नसेल पण 1981 साली दिलीप कुमार यांचा आसमा साहिबा (Asma Sahiba)शी दुसरा विवाह झाला होता, परंतु दोनच वर्षांत हेही नाते तुटले. सायरा बानूसोबत मुल नसल्याने त्यांनी हा विवाह केल्याचे बोलले जात असे.
> जुगनू, मेला, अंदाज, आन, दीदार, आजाद, मुगल-ए-आजम, कोहिनूर, गंगा-जमना, राम और श्याम, गोपी, क्रांति, विधाता, कर्मा आणि सौदागर हे दिलीप कुमार याचे चित्रपट गोल्डन ज्युबली ठरले होते. तर शहीद, नदिया के पार, आरजू, जोगन, अनोखा प्यार, शबनम, तराना, बाबुल, दाग, उड़न खटोला, इंसानियत, देवदास, मधुमती, यहूदी, पैगाम, लीडर, आदमी, संघर्ष हे चित्रपट सिल्व्हर ज्युबली ठरले होते.
> बैजू बावरा, प्यासा, कागज के फूल, संगम, दिल दौलत और दुनिया, नया दिन नई रात, जबरदस्त, लॉरेंस ऑफ अरेबिया, द बैंक मैनेजर अशा काही सुपरहिट चित्रपटांसाठी आधी दिलीप कुमार यांना विचारणा झाली झाली होती, मात्र त्यांनी हे चित्रपट नाकारले.
> 1980 साली दिलीप कुमार यांना मानाचे शेरीफ ऑफ मुंबई (Sheriff of Mumbai) हे पद देण्यात आले. भारत सरकारने त्यांचा 1991 साली पद्मभूषण तर 2015 साली पद्म विभूषण देऊन गौरव केला. याचसोबत 1998 साली पाकिस्तान सरकारने देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार निशान-ए-इम्तियाझ (Nishan-e-Imtiaz) दिलीप कुमार यांना देऊ केला.
> 1998 साली प्रदर्शित झालेला किला (Qila) हा दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट होय.
> दिलीप कुमार यांना वाढदिवस साजरा करायला आवडत नाही. 2011 साली त्यांनी त्यांचा 89 वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी मोठ्या जंगी पार्टीचे आयोजन केले होते. त्यानंतर मात्र त्यांनी वाढदिवस साजरा करण्यास नकार दिला.
1944 ते 2000 अशी जवळपास 55 वर्षे सतत सुरू असलेली चित्रपटक्षेत्रातील दिलीपकुमार यांची कारकिर्द कधीही झाकोळली नाही. त्यांचे स्थान अबाधित असेच राहिले आहे.