'रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटकाचा रायगडावर दमदार प्रयोग

रायगडाच्या माथ्यावरून रायगड अनुभवणं हा आनंद सोहळा होता. हा सोहळा अनुभवण्याची संधी ’वारसा’ दिनाच्या निमित्ताने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळ आणि मुंबई मराठी साहित्य संघ–नाटयशाखा रंगमंच सहयोगाने नाटयरसिकांना मिळाली. निमित्त होते ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ (Raigadala Jevha Jaag Yete) या विशेष नाटय प्रयोगाचे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने जागतिक वारसा दिनाचे आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रायगडावर मराठी रंगभूमीवरील ऐतिहासिक सुवर्ण पान म्हणूनच अजरामर झालेल्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा विशेष प्रयोग आयोजित केला होता. कायदा आणि न्यायव्यवस्था, उद्योग पर्यटन माहिती आणि जनसंपर्क या खात्याच्या राज्यमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांची विशेष उपस्थिती या प्रयोगाला लाभली. किल्ल्याचे महत्त्व पटवून देणारं छोटेखानी चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलं होत.

आपली परंपरा, आपली संस्कृती या साऱ्यांवर इतिहासाची अमीट छाप असते. आपल्याही नकळत आपण पुढच्या पिढ्यांसाठी नवा वारसा निर्माण करत असतो, मिळालेला हा वारसा जपणे आणि तो पुढील पिढीला हस्तांतरीत करणे खूप महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ मराठी रंगभूमीवरील ऐतिहासिक सुवर्ण पान म्हणूनच अजरामर आहे. हा ठेवा जतन व्हायाला हवा या उउद्देशाने हा अनोखा प्रयोग आम्ही केल्याचं त्यांनी यावेळी सांगितल. यावेळी आमदार श्री.भरत शेठ गोगावले, डॉ. नंदिनी भट्टाचार्य साहू (रीजनल डिरेक्टर ASI), डॉ.राजेंद्र यादव आदि मान्यवर उपस्थित होते. (हे देखील वाचा: Godavari: 'गोदावरी' सिनेमाला 'FIPRESCI-India'च्या पहिल्या दहा सिनेमांच्या यादीत मानांकन)

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. महाराष्ट्रातील दोन अतिशय धुरंधर राजांची व्यक्तिमत्वे या नाटकातून उलगडली जातात. रायगडावर झालेल्या शुभारंभाच्या प्रयोगाचा आनंद व्यक्त करताना पुढील वर्षभरात विविध भागांमध्ये या नाटकाचे अधिकाधिक प्रयोग करण्याचा मानस नाटकाच्या टीमने यावेळी व्यक्त केला. नाटकाच्या नव्या संचात प्रमोद पवार, यश कदम, उपेंद्र दाते, मोहन साटम, सुभाष भागवत, मा.चिन्मय, मयूर भाटकर, संध्या वेलणकर व अनिता दाते हे कलाकार असून याचे दिग्दर्शन उपेंद्र दाते यांनी केले आहे.