Why I killed  Gandhi: खासदार अमोल कोल्हे दिसणार नथुराम गोडसेच्या भूमिकेत; 30 जानेवारीला प्रदर्शित होणार चित्रपट, नवीन वादाची शक्यता
Dr. Amol Kolhe | (Photo Credit : Facebook)

हिंदू धर्मगुरू कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचे (Nathuram Godse) कौतुक केले होते. त्यानंतर याबाबत मोठा वादंग निर्माण झाला होता. गांधींना मारल्याबद्दल मी नथुराम गोडसेला सलाम करतो, असे ते म्हणाले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे मोठ्या पडद्यावर नथुराम गोडसेची भूमिका साकारणार आहेत. 'व्हाय आय किल्ड गांधी’ (Why I killed  Gandhi) असे या चित्रपटाचे नाव असून, तो येत्या 30 जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2017 सालचा आहे. परंतु या चित्रपटावरून नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारणे याला अनेक नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत भाष्य करताना नेते जितेंद्र आव्हाढ म्हणाले की, ‘राज्यातील कुठल्याही कलाकाराने नथुरामाची भूमिका करावी, हे मला पटलेले नाही. अभिनय वरवर करता येत नाही. एक कलाकार या नात्याने त्यांनी भूमिका नाकारायला हवी होती. ज्या नराधमाने महात्मा गांधी यांना गोळ्या घातल्या त्या माणसाचा अभिनय करणे मला मान्य नाही.’

या चित्रपटाबाबत आणि त्यात अमोल कोल्हे यांनी भूमिका साकारल्याबद्दल प्रतिक्रिया उमटत असताना, याबाबत अमोल कोल्हे यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात, ‘2017 साली केलेला ‘Why I killed  Gandhi’ हा सिनेमा Limelight या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असे समजले आणि अनेकांनी विचारले डॉक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत? उत्तरादाखल मला कुठेतरी वाचलेले वाक्य आठवले- ‘हा महाराष्ट्र कीर्तनाने पूर्णपणे घडला नाही आणि तमाशाने पूर्णपणे बिघडला नाही!’ या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला ठेवला तर मला या वाक्यात एक सकारात्मक गोष्ट जाणवते ती म्हणजे, ‘Reel लाईफ’ आणि ‘Real लाईफ’ यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा अधोरेखित करणे.’ (हेही वाचा: 'मुलगी झाली हो' मधील एक्झिट नंतर अभिनेते किरण माने यांची आगामी 'रावरंभा' सिनेमात वर्णी)

ते पुढे म्हणतात, ‘कलाकार म्हणून भूमिका साकारत असताना काही भूमिका आव्हानात्मक असतातच आणि त्यांच्या विचारधारेशी सुद्धा आपण सहमत असतो आणि त्या साकारताना समाधानही मिळते, परंतु काही अशा भूमिका अचानक समोर येतात ज्या विचारधारेशी आपण सहमत नसतो पण कलाकार म्हणून त्या आव्हानात्मक असतात. अशीच ही भूमिका नथुराम गोडसे. मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही, तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचारस्वातंत्र्याचा! याच मनमोकळेपणाने आपण या कलाकृतीकडे पहावे ही अपेक्षा!’