अभिनेत्री-निर्माती Pooja Bhatt चा PETA India कडून मोठा सन्मान; ठरली 'हा' पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय दिग्दर्शक
Pooja Bhatt (Photo Credits: Twitter)

प्राण्यांसाठी काम करणारी संस्था पेटा इंडियाकडून (PETA India) अभिनेत्रीपासून निर्माती बनलेल्या पूजा भट्टचा (Pooja Bhatt) मोठा सन्मान करण्यात आला आहे. फिश आय नेटवर्कची संचालिका असलेल्या पूजा भट्टने आपल्या कंपनीच्या चित्रपटांमध्ये कधीही जिवंत प्राणी न वापरण्याची शपथ घेतली आहे. अशी प्रतिज्ञा करणारी पहिली भारतीय दिग्दर्शक म्हणून पेटा इंडियाने पुरस्काराने तिला सन्मानित केले आहे. या पुरस्कार मिळाल्यानंतर पूजा भट्टने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर करून पेट इंडियाचे आभार मानले आहेत.

पेट इंडियाने आवाहन केले आहे की, चित्रपटांमध्ये जिवंत प्राण्यांऐवजी अॅनिमॅट्रॉनिक्स, CGI (संगणक-व्युत्पन्न प्रतिमा) आणि व्हिज्युअल इफेक्ट्स यांसारख्या उत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून प्राणी तयार करा.

पेटा इंडियाच्या माध्यमातून पाठवलेल्या पत्राची छायाचित्रे पूजाने ट्विटरवर शेअर केली आहेत. या पत्रात असे लिहिले आहे की, 'प्रिय मिस भट्ट, फिश आय नेटवर्कच्या वतीने, चित्रपटांमध्ये प्राण्यांचा वापर न करण्याची शपथ घेतल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. ही वचनबद्धता जगभरातील चित्रपट निर्मात्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल आणि त्यामुळे सेटवरील त्रासापासून, दुखापतींपासून प्राण्यांना वाचवता येईल. प्राण्यांबद्दलच्या तुमच्या दयाळूपणाबद्दल आम्ही तुम्हाला पुरस्काराने सन्मानित करत आहोत. अभिनंदन!'

पूजा भट्टने लिहिले आहे की, ‘माझ्या कोणत्याही चित्रपट/शोमध्ये कधीही एखाद्या प्राण्याची आवश्यकता भासल्यास त्यासाठी मी संगणक ग्राफिक्सचा वापर करेन. तसेच मी जास्तीत जास्त चित्रपट निर्मात्यांना यात सहभागी होण्याचे आवाहन करेन.’ (हेही वाचा: IIFA Awards 2022: अबुधाबीमध्ये होणारा आयफा पुरस्कार सोहळा पुढे ढकलला; 'हे' आहे कारण)

दरम्यान, पेट इंडियाने म्हटले आहे की, चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये वापरल्या जाणार्‍या प्राण्यांना बर्‍याचदा लांब सेटवर नेले जाते. त्यांना शारीरिक शिक्षा भोगाव्या लागतात, अन्नापासून वंचित राहावे लागते तसेच इतर प्रशिक्षणाला सामोरे जावे लागते. अनेकांना त्यांना त्यांच्या मुलांपासून/पालकांपासून दूर केले जाते. त्यांना पिंजऱ्यात किंवा साखळदंडात बांधले जाते. चित्रीकरणादरम्यान प्राण्यांना दुखापत झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.’