IIFA Awards 2022: अबुधाबीमध्ये होणारा आयफा पुरस्कार सोहळा पुढे ढकलला; 'हे' आहे कारण
IIFA Awards (Photo Credits: Twitter)

IIFA Awards 2022: बावीसावा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी (IIFA) पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा कार्यक्रम अबुधाबी येथे होणार होता. IFA च्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून UAE च्या राष्ट्रपतींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी आयफा पुरस्कार सोहळा मार्चमध्ये होणार होता. मात्र, कोरोनाबाबत खबरदारी घेत तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

दरम्यान, 20 आणि 21 मे रोजी हा पुरस्कार सोहळा होणार होता. आता हा कार्यक्रम अबुधाबीमध्ये 14, 15 आणि 16 जुलै रोजी होणार आहे. राष्ट्रपतींच्या निधनावर आयफाने ट्विट केले की, 'संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख खलीफा बिन झायेद अल नाह्यान यांच्या निधनाने दुःख झाले. आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि संयुक्त अरब अमिरातीतील लोकांप्रती शोक व्यक्त करतो. देव त्यांना शांती देवो.' (हेही वाचा - The Archies Poster: 'द आर्चीज'चे पहिले पोस्टर रिलीज, झोया अख्तरचा सिनेमा OTT होणार रिलीज)

UAE च्या राष्ट्राध्यक्षांचे शुक्रवारी निधन झाले. 73 वर्षीय शेख खलिफा यांच्या निधनाने जगभरातील लोकांनी शोक व्यक्त केला. रिपोर्टनुसार, ते अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनानंतर यूएईमध्ये 40 दिवसांची राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

आयफा हा बॉलिवूडसाठी मोठा पुरस्कार सोहळा आहे. जिथे सर्व दिग्गज स्टार्स स्टेजवर परफॉर्मन्स करतात. यावेळी सलमान खान, रणवीर सिंग, कार्तिक आर्यन, सारा अली खान आणि इतर कलाकार कार्यक्रमात परफॉर्म करणार आहेत. मात्र, तारखा जसजशा पुढे सरकतील तसतशा त्यांना त्यांच्या वेळापत्रकातून वेळ काढावा लागणार आहे.