कालच्या भागात कप्तानपदासाठी नवा टास्क सुरु झाला आहे. या टास्कमध्ये शिवला खुर्चीवरून उठवण्यासाठी टीम B मधील लोक फार प्रयत्न करत आहेत. यासाठी त्याला वीणाबद्दल बोलून उकसवण्याचा सर्वात जास्त प्रयत्न केला जातो. मात्र या कशालाच शिव धजत नाही. त्यानंतर त्याला कचऱ्याचा वासही दिला जातो. पुढे शिवला उठवण्यासाठी काही उपाय शोधताना नेहाला रुपालीच्या ड्रॉवरमध्ये तिचे परफ्युम सापडते. हाच मुद्दा घेऊन ती रुपालीवर चोरीचा आळ घेते. यावर रुपाली आणि नेहामध्ये खटका उडतो.
अखेर शिव हा टास्क पूर्ण करतो, त्यानंतर किशोरी सिंहासनावर बसते. ती उठावी म्हणून तिच्या वस्तूंचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो, तिलाही कचऱ्याचा वास दिला जातो. टीम B खूप प्रयत्न करूनही किशोरी खुर्चीवरून उठत नाही. अशा प्रकारे शिव आणि किशोरी दोघेही या टास्कमध्ये जिंकल्यावर टीम B जरा घाबरल्यासारखी वाटते. रात्री त्यांच्याकडून दुसऱ्या दिवसाची स्ट्रॅटेजी प्लान केली जाते.
टास्कचा त्या दिवसाचा वेळ संपल्यावर पराग, रुपालीबद्दल त्याला चिडवले गेल्याने चिडलेला दिसतो. नेहा आणि वैशाली, पराग आणि रुपाली यांच्या नात्याबद्दल सतत चिडवत असल्याबद्दल तो आक्षेप नोंदवतो. माझा आणि रुपालीचा संबंध लावू नका अशी विनंती तो सर्वांना करत असतो. यावर सर्वजण, ‘तू सुरुवात केली, तू तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केलास, नाते तू सुरु केलेस’ त्यामुळे आता आम्ही फक्त बोलतोय, आणि जे आम्हाला दिसेल त्यावर आम्ही बोलणार असे प्रत्युत्तर करतात. यावर घरात सकाळपर्यंत चर्चा रंगते.
टास्कमध्ये पुढे पराग सिंहासनावर बसतो. परागला सिंहासनावरून उठवण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न केले जातात. त्याच्याअंगावर अनेक गोष्टी टाकल्या जातात, त्याला मेकअप केला जातो, त्याला ओढले जाते मात्र तरी पराग बसूनच राहतो. अखेर टीम B बळाचा वापर करून परागला खाली खेचतात. इथे सदस्य आक्रमक झाल्याने बिग बॉसकडून हा टास्क रद्द केला जातो.