गाडीत जर पेट्रोलऐवजी डिझेल किंवा डिझेलऐवजी पेट्रोल भरले तर काय करावे? जाणून घ्या या काही खास टिप्स
Petrol/ Diesel Car(Photo Credits: PTI)

सध्याच्या धावत्या जगात प्रत्येकाकडे वाहन असणे ही काळाची गरज बनली आहे. अशा वेळी गाडी खरेदी करताना पेट्रोल किंवा डिझेल वर चालणाऱ्या गाड्या बाजारात उपलब्ध आहेत. परंतु, पेट्रोल पंपवर आपण इंधन भरण्यास गेलो की तिथे असलेल्या गर्दीमुळे कधीही आपण आपल्या गाडीत चुकीचं इंधन भरण्याची शक्यता देखील असते. कधी कोणी पेट्रोलवर चालणाऱ्या गाडीत डिझेल भरतं तर कधी डिझेलवर चालणाऱ्या गाडीत पेट्रोल भरतं. पण अशा परिस्थितीत नेमकं काय करावं हे आज आपण थोड्यात पाहणार आहोत.

पेट्रोल आणि डिझेल गाड्यांमध्ये नेमका फरक काय?

मुळात पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांचे आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचे इंजिन वेगवेगळे असते. पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये गाडी चालू करण्यासाठी स्पार्किंग प्लग असतात तर डिझेल गाड्यांमध्ये फ्युएल इन्जेक्टर असतात. मुळात इंधनांच्या प्रकारात, डिझेल हे पेट्रोलपेक्षा जड असते. तर पेट्रोल हे डिझेलपेक्षा अधिक ज्वलनशील असते.

पेट्रोल ऐवजी डिझेल भरले तर काय करावं?

आपल्या दुचाकी वाहनामध्ये तुम्ही जर चुकून पेट्रोल ऐवजी डिझेल भरले, तर त्वरित गाडीच्या इंधनाची टाकी रिकामी करा. त्यानंतर इंधनाचा पाईप आणि कार्बोरेटर स्वच्छ करावा. जर तुम्ही डिझेलवर दुचाकी चालवण्याचा प्रयत्न केलात तर मात्र तुमची गाडी चालू होणार नाही. आणि चालू झालीच तरी इंजिनवर त्याचा जोर पडून इंजिनातून आवाज येण्यास सुरुवात होईल. इतकंच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर धूर देखील येणास सुरुवात होईल आणि गाडीचे गॅस्केट जळून जाईल. शेवटी गाडीचे इंजिन निकामी होऊ शकते.

डिझेल ऐवजी पेट्रोल भरले तर तर काय करावं?

असं केल्यास घाबरुन जाऊ नये. सर्वात आधी गाडी बंद करावी. नंतर मेकॅनिकला बोलवून त्याच्या मदतीने इंधनाची टाकी साफ करून घ्यावी. तसेच इंजिनाच्या ज्या ज्या भागात पेट्रोल गेले असेल त्या सर्व जागा ड्रेन करून घ्याव्यात. अशाने गाडीच्या इंजिनाचे कोणतेही नुकसान होत नाही.