केंद्र सरकारकडून Tesla ला मोठा झटका; इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात शुल्क कमी करण्याची कोणतीही योजना नाही 
Elon Musk (Photo Credits: Getty Images)

अमेरिकेची प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicles) कंपनी टेस्ला (Tesla) आपले पहिले वाहन भारतात लॉन्च करणार आहे. नुकतेच कंपनीचा मालक एलोन मस्कने भारतातील भारी आयात शुल्काबद्दल (Import Duties) प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता केंद्राने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे आणि ती टेस्लाच्या अपेक्षांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. सरकारने कोणत्याही प्रकारच्या आयात शुल्कात कपात करण्यास नकार दिला आहे, जे टेस्लासाठी एका झटका ठरू शकते. अशाप्रकारे भारत सरकार आणि टेस्ला यांच्यातील आयात शुल्क वादामुळे भारतामध्ये टेस्लाच्या कार येण्यास अजून वेळ लागणार आहे.

टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार्सची भारतात प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा आहे. टेस्लाने भारतात आपल्या इलेक्ट्रिक कारच्या 3 मॉडेल्सची चाचणी केली आहे. आता ऊर्जा आणि अवजड उद्योग मंत्रालयात नुकतेच सामील झालेले मंत्री कृष्ण पाल गुर्जर म्हणाले की, ‘टेस्लाचा भारतामधील प्रवेश सोपे करण्याचा केंद्राचा कोणताही प्रस्ताव नाही.’ येथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा म्हणजे, गुर्जर यांची प्रतिक्रिया टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांच्या ट्वीटनंतर एक आठवड्यांनी आली आहे.

मस्कने गेल्या आठवड्यात खुलासा केला की, त्यांना भारतातील इलेक्ट्रिक वाहनांसाठी तात्पुरत्या दरात सूट मिळण्याची अपेक्षा आहे. मस्क म्हणाले होते की टेस्ला लवकरच भारतात आपल्या कार लाँच करू इच्छित आहे, परंतु भारतीय आयात शुल्क हे इतर देशांपेक्षा जगात सर्वाधिक आहे.

टेस्लाच्या भारतातील आयात शुल्काबाबतच्या निर्णयामुळे देशातील कार उत्पादकांमध्ये वादाला तोंड फुटले आहे. ह्युंदाईने टेस्लाला कर कमी करण्याची मागणी केली, तर टाटा मोटर्सने भारतीय कार उत्पादकांसाठीही समान वागणुकीची मागणी केली आहे. ओला इलेक्ट्रिक (जे भारतात आपले पहिले उत्पादन लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे) म्हणाले की, कर कपातीव्यतिरिक्त स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्यावर अधिक भर दिला पाहिजे. (हेही वाचा: Tesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती)

दरम्यान, भारत सध्या आयात केलेल्या गाड्यांवर 60 ते 100 टक्के सीमा शुल्कची मागणी करतो. सरकार 40,000 डॉलर पेक्षा कमी किंमतीच्या कारसाठी 60% आणि त्यापेक्षा जास्त दाराच्या कारसाठी 100% आयात शुल्क लादत आहे.