
इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने (Economist Intelligence Unit) जगातील सर्वात सुरक्षित शहरांचा निर्देशांक सांगणारा एक अहवाल प्रसिद्ध केला. हा अहवाल निर्देशांकाच्या तिसर्या पुनरावृत्तीवर आधारित आहे, ज्यात 60 शहरांचा समावेश असून, डिजिटल सुरक्षा, आरोग्य सुरक्षा, पायाभूत सुविधा सुरक्षा आणि वैयक्तिक सुरक्षा या क्षेत्रातील 57 निर्देशकांवर हा अहवाल आधारीत आहे. आश्चर्य म्हणजे सलग तिसऱ्यांदा सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये टोकियोने (Tokyo) प्रथम स्थान मिळविले आहे, तर सिंगापूर (Singapore) व ओसाका अनुक्रमे दुसर्या व तिसर्या स्थानावर आहेत.
वॉशिंग्टन, डी.सी. (Washington, DC) हे शहर या यादीत नवीन सदस्य आहे. सेफ सिटी इंडेक्समध्ये पहिल्यांदाच त्याने पहिल्या दहामध्ये प्रवेश केला आहे, तर हाँगकाँग पूर्वीच्या मानांकनातून खाली घसरले आहे. या यादीमध्ये भारताच्या फक्त दोन शहरांना स्थान मिळाले आहे. मात्र तीही शेवटच्या काही क्रमांकावर. नवी दिल्ली (New Delhi) या यादीमध्ये 53 व्या स्थानावर आहे, तर मुंबई, कराची आणि ढाका अनुक्रमे 45, 57 आणि 56 व्या स्थानावर आहेत. भारतीय उपखंडातील देशांनी इतर घटकांपेक्षा डिजिटल सुरक्षेबाबत अतिशय खरव कामगिरी बजावली आहे. आश्चर्य म्हणजे जगातील बरीच सुरक्षित शहरे ही आशिया-पॅसिफिक मधील आहेत. (हेही वाचा: ताजमहाल नाही, तर मुंबईची झोपडपट्टी धारावी ठरले आशियातील लोकप्रिय पर्यटन स्थळ, जाणून घ्या संपूर्ण यादी)
ही आहेत जगातील सर्वात सुरक्षित 10 शहरे –
- टोकियो, जपान
- सिंगापूर
- ओसाका, जपान
- आम्सटरडॅम, नेदरलँड्स
- सिडनी, ऑस्ट्रेलिया
- टोरोंटो, कॅनडा
- वॉशिंग्टन डीसी, यूएस
- कोपेनहेगन, डेन्मार्क
- सेओल, दक्षिण कोरिया
- मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
लंडन आणि न्यूयॉर्क या यादीत 14 व्या आणि 15 व्या स्थानावर आहेत. या यादीमध्ये सर्वात शेवटी लागोस, वेनेझुएलामधील कराकस, म्यानमारमधील यंगून, पाकिस्तानमधील कराची आणि बांगलादेशातील ढाका यांचा समावेश आहे.