कोरोना व्हायरस (Coronavirus) साथीच्या आजारामुळे आतापर्यंत जगभरात 23 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बर्याच देशांनी कोरोनाची लस बनविली आहे व सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. परंतु हा विषाणू नक्की कुठे उत्पन्न झाला याबाबतची शंका अजूनही कायम आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) टीमने चीनला (China) भेट दिली होती. मात्र त्यांनी हा विषाणू वुहान लॅबमधून लीक झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. दुसरीकडे डब्ल्यूएचओला प्रारंभिक डेटा न दिल्यामुळे चीनवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याचसोबत डब्ल्यूएचओ टीमच्या तपासणीत असे दिसून आले आहे की, डिसेंबरमध्येच वूहानमध्ये कोरोनाचे 13 वेगवेगळे व्हेरिएंट पाहिले गेले.
तज्ज्ञ चमूच्या सदस्याने असा दावा केला आहे की, वुहानमधील कोरोनाचा उद्रेक हा जितका जगाला दाखविला त्या पेक्षा तो खूप मोठा होता असे संकेत मिळाले आहेत. सीएनएनशी बोलताना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मिशनचे पीटर बेन एम्ब्रेक यांनी सांगितले की, 2019 मध्येच कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याची चिन्हे दिसली आहेत. वुहान दौर्यादरम्यान, डब्ल्यूएचओ टीमला जवळपास 40 वर्षांच्या कोरोनाचा संसर्ग झालेल्या पहिल्या रूग्णांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. ही व्यक्ती कुठेही देशाबाहेर गेली नव्हती आणि 8 डिसेंबर रोजी त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे उघडकीस आले होते.
डब्ल्यूएचओ टीमने या शहरातील कोरोनाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. टीमचे म्हणणे आहे की वुहानमध्ये कोरोनाने अपेक्षेपेक्षा 500 टक्क्यांनी अधिक नाश केला. तसेच डिसेंबरमध्येच वूहानमध्ये कोरोना विषाणूचे 13 वेगवेगळे जेनेटिक सिक्वेंस दिसून आले होते. कोरोना विषाणूच्या जेनेटिक सिक्वेंसमध्ये हा बदल सामान्य आहे आणि जसजसा विषाणूचा प्रसार झाला आणि तो पुन्हा निर्माण झाला, हा सिक्वेंस बदलत गेला.
सिडनी विद्यापीठाचे व्हायरोलॉजिस्ट एडवर्ड होम्स म्हणाले, 'वुहानमधील डिसेंबर 2019 मधील कोरोना विषाणूच्या नमुन्यांमध्ये अनुवांशिक तफावत होती. त्यातून असे दिसून येते की त्याच महिन्यात तो बराच काळ पसरत होता.’ यावरून हे स्पष्ट झाले की कोरोना विषाणू बहुधा डिसेंबरपूर्वी जगभर पसरत होता.