प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Twitter)

कैक वर्षात या जगाने अनेक मोठे बदल पाहिले आहेत. अनेक मोठ्या हुकूमशहांनी जनतेला आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु समाजामध्ये बदल घडायचे तसे घडलेच. तर जिथे अशा हुकुमशहांचे काही चालले नाही तिथे बदल घडवण्याच्या नावाखाली एका मुख्याध्यापकाचे म्हणणे कोणी ऐकून घेईल आणि त्याला मान देईल? तर स्पेनमधील (Spain) एका चळवळीची चर्चा सध्या पुन्हा सुरु आहे. लिंग समानतेशी (Gender Equality) निगडीत ही चळवळ असून 'कपड्यांना लिंग नसते’ असे यातून दर्शवायचे आहे. त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटतील असे कपडे तुम्ही घाला असे या मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.

ही चळवळ स्पेनमध्ये सुरू झाली, परंतु आता स्कॉटलंड आणि ब्रिटनमध्ये (यूके) ही चळवळ जोर धरू लागली आहे. ही चळवळ 2020 मध्ये सुरू झाली होती, परंतु सध्या स्कॉटलंडमधील एका शाळेने आपल्या मुलांसाठी आणि पुरुष शिक्षकांसाठी नवीन आदेश जारी केला होता. या शाळेमध्ये एक उपक्रम पार पडला ज्यामध्ये मुलांना आणि पुरुष शिक्षकांना मुलींप्रमाणे स्कर्ट घालूनच शाळेत येण्यास सांगण्यात आले होते. या अंतर्गत लैंगिक असमानता दूर करण्याचा संदेशही देण्यात आला आहे.

एडिनबर्गच्या कॅसलव्ह्यू प्रायमरी स्कूलने हा आदेश जारी केला होता. या शाळेतील मुलांनीही 'वेअर अ स्कर्ट टू स्कूल' मोहिमेत सहभाग घेतला, जो #ClothesHaveNoGender चळवळीचा एक भाग आहे. या आंदोलनाला सोशल मीडियावरही मोठा पाठिंबा मिळत आहे. हा कार्यक्रम स्वेच्छेवर आधारित होता, ज्या विद्यार्थ्यांना भाग घ्यायचा नव्हता त्यांना स्कर्ट घालण्याची सक्ती करण्यात आली नाही. शाळेच्या या उपक्रमाला पालक आणि इंटरनेट वापरकर्त्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले मात्र काहींनी यावर टीकाही केली. (हेही वाचा: आता शाळेतील मुलांना दाखवले जाणार 'समलैंगिक संबंधा'वर आधारीत आठ लघुपट; जागरुकतेसाठी प्रयत्न)

दरम्यान, काही काळापूर्वी स्पेनमध्ये स्कर्ट घालून आल्याने एका विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर या मुलाला न्याय मिळावा म्हणून पुरुष शिक्षक व विद्यार्थी स्कर्ट परिधान करून वर्गात येत होते. तेव्हापासून जगातील इतर काही देशांमध्येही ही चळवळ सुरु झाली व ती आता जोर धरू लागली आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या स्कॉटिश शाळेच्या आदेशानंतर पुन्हा एकदा हे आंदोलन सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.