कोरोना विषाणू संसर्गामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेल्या आहेत. अनेक देशांमध्ये महागाई व बेरोजगारी वाढली आहे. या संसर्गाचा मोठा फटका इंग्लंडला बसल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे 2020 मध्ये ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेमध्ये (UK Economy) 300 पेक्षा जास्त वर्षात सर्वात मोठी घसरण झाली. गेल्या वर्षी युकेच्या अर्थव्यवस्थेत 9.9 टक्के घट नोंदवली गेली होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी सांगितले की, जागतिक आर्थिक संकटाच्या वेळी 2009 मधील घटच्या तुलनेत 2020 मधील आर्थिक घट दुप्पट आहे. 1709 मध्ये ग्रेट फ्रॉस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिवाळ्यात ब्रिटनमध्ये झालेल्या घसरणनंतरची ही मोठी घसरण आहे. त्यावेळी ब्रिटन ही प्रामुख्याने कृषी अर्थव्यवस्था होती.
कोरोना साथीच्या रोगामुळे ब्रिटनमधील दुकाने आणि रेस्टॉरंट्स बंद होती. याव्यतिरिक्त, ट्रॅव्हल उद्योग आणि उत्पादन व्यवसायावर याचा गंभीर परिणाम झाला. ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'आजच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की साथीच्या परिणामी अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. जगभरातील अनेक देशांनी हीच परिस्थिती अनुभवली आहे. हिवाळ्यामध्ये अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याचे काही सकारात्मक चिन्हे आहेत, परंतु सध्याच्या लॉकडाऊनचा बरेच लोक आणि व्यवसायांवर महत्त्वपूर्ण परिणाम होत आहे.'
वार्षिक बजेट भाषणात नोकऱ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन योजना जाहीर करणार असल्याचे सुनक यांनी सांगितले. ते 3 मार्चला हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बजेटला संबोधित करणार आहेत. दरम्यान, कोविड-19 चा इतर बर्याच औद्योगिक लोकशाहीपेक्षा ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर जास्त परिणाम झाला आहे. 2020 मध्ये फ्रान्चा जीडीपी 8.3 टक्क्यांनी, जर्मनीची अर्थव्यवस्था पाच टक्क्यांनी आणि अमेरिकेची 3.5 टक्क्यांनी घसरली. (हेही वाचा: AstraZeneca-Oxford COVID-19 Vaccine ची प्रथमच 6 ते 17 वयोगटातील मुलांवर चाचणी)
दरम्यान, इंग्लंडमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 4,047,843 रुग्ण आढळून आले असून, 117,396 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 2,190,406 रुग्ण बरे झाले असून, सध्या 1,740,041 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.