Pakistan Shocker: टकटॉक व्हिडिओवरुन वाद, 14 वर्षीय मुलीने बहिणीवर झाडल्या गोळ्या
TikTok (PC - pixabay)

पाकिस्तानातील (Pakistan Shocker) पंजाब राज्यातील गुजरात जिल्ह्यातील सराय आलमगीर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. टिकटॉक व्हिडिओवरुन वाद झाल्याने एका 14 वर्षीय मुलीने चक्क आपल्या बहिणीवर गोळीबार केला आहे. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे. प्राप्त माहितीनुसार सबा अफझल आणि मारिया अफझल या दोन्ही बहिणी व्हिडिओ बनवत होत्या. दरम्यान, त्यांच्यात वाद झाला. ज्यातून ही घटना घडली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे.

टिकटॉक व्हिडिओच्या चित्रीकरणादरम्यान दोन बहिणींमधील वाद वाढला त्यातून 14 वर्षीय सबा अफझलने तिच्या बहिणीवर गोळी झाडली. या प्रकरणात सदर पोलिस ठाण्यात तिच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे काही दिवसांपूर्वीच अशाच एका प्रकारात शेखूपुरा जिल्ह्याजवळ टिकटॉकसाठी व्हिडिओ चित्रित करताना तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. (हेही वाचा, Bullets In Baby Diaper: बेबी डायपरमध्ये बंदुकीच्या गोळ्या, विमानतळ पोलिसांकडून एकास अटक)

प्राप्त माहितीनुसार, सफदराबाद तहसीलमधील खानकाह डोगरन शहरातील रहिवासी, मोटारसायकलवरून टिकटॉक व्हिडिओ रेकॉर्ड करत होते. दुर्दैवाने लक्ष विचलित झाल्यामुळे त्यांच्या मोटारसायकलची विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारसोबत समोरासमोर धडक होऊन तीनही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उल्लेखनीय म्हणजे, 24 डिसेंबर रोजी सिंध प्रांताची राजधानी कराची येथील जामिया बिनोरिया टाऊन या प्रसिद्ध धार्मिक विद्यालयाने टिकटॉकचा वापर बेकायदेशीर आणि 'हराम' घोषित करणारा फतवा (धार्मिक हुकूम) जारी केला आहे. ज्याला आधुनिक काळातील सर्वात मोठा प्रलोभन म्हणून घोषित केले आहे, असे पाकिस्तानी स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले.