Russia Ukraine War (PC- PTI)

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला 72 तासांहून अधिक काळ लोटला आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीवमध्ये प्रवेश केल्याने रस्त्यांवर युद्ध सुरू झाले आहे. कीवच्या प्रशासनाने तेथील नागरिकांना घरे न सोडण्याचा इशारा दिला आहे. युक्रेनने असेही म्हटले आहे की, त्यांनी सैन्य घेऊन जाणारे एक रशियन विमान पाडले आहे. यासंदर्भात आज तकने वृत्त प्रकाशित केलं आहे.

युक्रेन-रशिया युद्धात आतापर्यंत काय घडले?

रशियाने गुरुवारी पहाटे आपल्या सैन्याला युक्रेनवर हल्ला करण्याची परवानगी दिली होती. तेव्हापासून युक्रेनमध्ये विध्वंसाचे दृश्य आहे. युक्रेनवर रशियन हल्ल्याचा आज तिसरा दिवस आहे. राजधानी कीवमध्ये जोरदार गोळीबाराचे आवाज येत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (वाचा - Ukraine-Russia War: Vladimir Putin एक दिवस जगावर राज्य करतील; Bulgarian Baba Vanga यांनी केली होती भविष्यवाणी)

  • अनेक लोक आपला जीव वाचवण्यासाठी घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जात आहेत. तथापि, कीवमध्ये रशियन आणि युक्रेनियन सैन्यांमध्ये गोळीबार सुरू झाल्यामुळे लोकांनी घरातच राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
  • युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि युद्ध संपवण्यासाठी शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एक ठराव मांडण्यात आला, जो रशियाने आपला व्हेटो पॉवर वापरून थांबवला. 15 सदस्यीय सुरक्षा परिषदेत 5 स्थायी सदस्य आहेत.

    भारत 15 स्थायी सदस्यांपैकी एक आहे. भारताने रशियाविरोधात मतदानात भाग घेतला नाही. भारतासोबतच चीन आणि संयुक्त अरब अमिरातीही मतदानापासून दूर राहिल्यामुळे या प्रस्तावाला केवळ 11 सदस्यांचा पाठिंबा मिळू शकला.

  • अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन युनियनने रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. तैवाननेही रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध केला असून, ते रशियाच्या विरोधात सर्व देशांच्या समर्थनात आहेत आणि त्यावर लादलेल्या निर्बंधांचे समर्थन करत आहे.
  • युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यात म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्षांसह सर्व मोठे नेते युक्रेनमध्ये आहेत आणि देशाला वाचवण्यासाठी लढत आहेत. आम्ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी उभे आहोत. या युद्धात आमचे नायक असलेल्या लोकांचे आभार मानतो, असे त्यांनी म्हटले आहे.
  • व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनीही रशियाविरोधात नाटो आणि युरोपीय देशांनी केलेल्या अपुऱ्या कारवाईबद्दल संताप व्यक्त केला आहे. युक्रेन नाटोमध्ये सामील होणार का, असा प्रश्न जेव्हा नाटोला विचारला जातो, तेव्हा सर्व देश गप्प बसतात, कोणीही बोलत नाही, सगळे घाबरतात, असेही त्यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
  • युरोपातील देशांनी योग्य आणि जलद पावले उचलली तर युद्ध थांबवता येईल, असे झेलेन्स्की म्हणतात.
  • हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. या संवादादरम्यान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना हिंसाचार संपवण्याचे आवाहन केले. पुतीन यांनी इतर अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी संवाद साधला.
  • युक्रेन आणि रशिया यांच्यात चर्चा होण्याचीही शक्यता आहे. रशियाच्या अध्यक्षीय कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे की, रशिया युक्रेनशी चर्चेसाठी तयार आहे. त्याचवेळी, त्यांनी अशी अट घातली आहे की, ही चर्चा बेलारूसची राजधानी मिन्स्क येथे होईल आणि त्यात युक्रेनची परिस्थिती तटस्थ म्हणून घोषित केली जाईल. युक्रेनचे सैन्य कमी करण्याच्या अटीवर चर्चा होईल, अशी अटही रशियाने ठेवली आहे.

आतापर्यंत नुकसान कोणाचे?

  • आज रशियन हल्ल्याचा तिसरा दिवस आहे, दरम्यान, दोन्ही बाजूंनी शहीद झालेल्या सैनिकांबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, युक्रेनने एक हजाराहून अधिक रशियन सैनिकांना ठार केले आहे. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी एक व्हिडिओ जारी केला की, या युद्धात त्यांचे 137 सैनिक मारले गेले.
  • त्याच वेळी, ब्रिटनने या हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांची स्वतंत्र आकडेवारी जारी केली आहे, त्यानुसार 450 रशियन सैनिक युद्धात मारले गेले आहेत. युक्रेनमधून 194 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 57 नागरिकांचा समावेश आहे.
  • युक्रेनमध्ये रशियाच्या हवाई हल्ल्यात किमान 25 नागरिक ठार आणि 102 जखमी झाल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, त्यांच्या सैन्याने युक्रेनचे 211 लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत. युक्रेनने म्हटले आहे की, त्यांनी 80 रशियन टाक्या, 516 चिलखती वाहने, 7 हेलिकॉप्टर, 10 विमाने आणि 20 क्रूझ क्षेपणास्त्रे नष्ट केली आहेत.