Tech Sector Layoffs: कोरोनानंतर अजूनही जागतिक स्तरावर स्टार्टअप इकोसिस्टममध्ये टाळेबंदी (Layoffs) सुरूच आहे. प्रत्येक महिन्यात हजारो लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. अशात या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत तंत्रज्ञान क्षेत्रातील (Tech Sector) तब्बल 80,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले.
तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्यांमधील कपातीवर लक्ष ठेवणाऱ्या Layoff.fy या पोर्टलच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगभरात 279 टेक कंपन्यांनी 3 मे पर्यंत 80,230 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. 2022 आणि 2023 मध्ये, जगभरातील टेक कंपन्यांनी 425,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते.
जागतिक मंदीचा आयटी/टेक आणि स्टार्टअप इकोसिस्टमवर मोठा परिणाम झाला आहे. अलीकडेच, यूएस ग्राहक अनुभव व्यवस्थापन व्यासपीठ Sprinklr ने सुमारे 116 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. व्यायाम उपकरणे आणि फिटनेस कंपनी पेलोटनने या आठवड्यात आपल्या कर्मचाऱ्यांपैकी 15 टक्के किंवा सुमारे 400 कर्मचारी काढून टाकण्याची योजना जाहीर केली. वृत्तानुसार, नुकतेच गुगलने पुनर्गठन सुमारे 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
एलोन मस्क यांच्या टेस्लाने जागतिक कर्मचाऱ्यांमधून 10 टक्के किंवा 14,000 कर्मचारी कमी केल्याच्या काही आठवड्यांतच पुन्हा शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकले. मस्कने संपूर्ण टेस्ला चार्जिंग टीमला टाळेबंदीच्या नवीन फेरीत काढून टाकले. भारतात, राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म ओला कॅब्सने पुनर्रचना प्रक्रिया सुरू केली आहे जी त्याच्या किमान 10 टक्के कर्मचाऱ्यांवर परिणाम करेल. (हेही वाचा: Startup Funding: यंदाच्या आर्थिक वर्षात भारतातील स्टार्टअप फंडिंगमध्ये 17 टक्क्यांनी घट)
दरम्यान, मोठ-मोठ्या टेक कंपन्या एआय मशीन लर्निंग आणि डेटा सायन्सला खूप महत्त्व देत आहेत. याचा थेट परिणाम कंपन्यांच्या मूळ रचनेवर होत आहे. अशात दिवसेंदिवस मोठ्या संख्येने नोकऱ्या कमी करणाऱ्या टेक कंपन्यांच्या यादीत आणखी नावे जोडली जात आहेत. सध्याची परिस्थिती पाहता भविष्यातील परिस्थिती चांगली दिसत नाही. संशोधकांचा असा विश्वास आहे की, 2024 पर्यंत रोजगार संकट कायम राहू शकते.