Smart City Index 2020: स्मार्ट सिटी इंडेक्सच्या ग्लोबल रँकिंगमध्ये भारतीय शहरांची मोठी घसरण; Singapore ने पटकावला पहिला क्रमांक, जाणून घ्या Top-10 शहरे
Singapore (Photo Credits: Needpix.com)

भारतामधील नवी दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बेंगलुरू या चार शहरांची स्मार्ट शहरांच्या (Smart City) जागतिक क्रमवारीत मोठी घसरण नोंदवली आहे. या यादीमध्ये सिंगापूरने (Singapore) प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD) ने सिंगापूर युनिव्हर्सिटी फॉर टेक्नॉलॉजी अँड डिझाइन (SUTD) च्या सहकार्याने, 2020 स्मार्ट सिटी इंडेक्स (Smart City Index 2020) यादी जाहीर केली असून, कोविड-19 च्या काळात शहरांमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका कशी आहे, याविषयीचे मुख्य निष्कर्ष दिले गेले आहेत.

2020 स्मार्ट सिटी इंडेक्समध्ये हैदराबाद 85 व्या स्थानावर आहे, 2019 मध्ये ते 67 वर होते. नवी दिल्लीला 86 वे स्थान मिळाले आहे, जे 2019 मध्ये 68 व्या स्थानावर होते. मुंबईला मागच्या वर्षीच्या 78 स्थानावरून यंदा 93 वे स्थान प्राप्त झाले आहे. बेंगलोरला मागच्या वर्षी 79 वे स्थान मिळाले होते, जे यावर्षी 95 वे आहे. अशाप्रकारे यावर्षी भारतातील शहरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सध्या कोरोना विषाणू साथीच्या काळात तंत्रज्ञानाची प्रगती अद्ययावत नसणे, हे देखील यामागचे कारण असू शकते असे अहवालामध्ये म्हटले आहे.

त्यात पुढे असेही नमूद केले आहे की, 'भारतीय शहरे ही अजिबात तयार नसल्याने त्यांना कोरोना साथीच्या रोगाचा जास्त त्रास सहन करावा लागला.' तसेच शहरांमध्ये काही गोष्टींना प्राधान्य देण्याची गरज आहे, असेही म्हटले आहे. बंगळुरू आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये रस्त्यांची कोंडी व दिल्ली आणि हैदराबादमध्ये मूलभूत  सुविधा, अशा गोष्टींकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे. (हेही वाचा: जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यासाठी लागू शकतात 5 वर्षे; वीस वर्षांत प्रथमच वाढेल गरीबी दर- World Bank Chief Economist Carmen Reinhart)

2020 स्मार्ट सिटी इंडेक्समध्ये प्रथम क्रमांकावर सिंगापूर असून, त्यानंतर हेलसिंकी आणि झ्युरिक अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर आहे. पहिल्या दहामध्ये ऑकलंड (4), ओस्लो (5), कोपेनहेगन (6), जिनेव्हा (7), ताइपे सिटी (8), अॅमस्टरडॅम (9) आणि न्यूयॉर्क शहर दहाव्या स्थानावर आहे. एप्रिल आणि मे 2020 मध्ये 109 शहरांतील शेकडो नागरिकांचे सर्वेक्षण केले गेले. त्यांच्या शहरामधील आरोग्य आणि सुरक्षा, गतिशीलता, क्रियाकलाप, संधी आणि प्रशासन या पाच प्रमुख क्षेत्रांच्या तांत्रिक तरतुदीवर त्यांना प्रश्न विचारले गेले. त्यांनी दिलेल्या उत्तरावरून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.