Coronavirus. (Photo Credit: PTI)

इस्रायलमध्ये (Israel) कोरोनाशी संबंधित एक अत्यंत दुर्मिळ प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी एलोन हेल्फगॉट (Alon Helfgott) नावाच्या 11 वर्षाच्या मुलाला कोरोना व्हायरसच्या तीन वेगवेगळ्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. मध्य इस्रायलच्या केफर सबाह (Kefar Saba) येथे राहणाऱ्या एलोनला अल्फा व्हेरिएंट, डेल्टा व्हेरिएंट आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली आहे. या आठवड्यात एलोनला तिसऱ्यांदा कोविडची लागण झाल्याची पुष्टी झाली. यापूर्वी त्याला अल्फा प्रकार आणि डेल्टा प्रकाराची लागण झाली होती.

चॅनल 12 च्या वृत्तानुसार, 11 वर्षाचा एलोन आपण ठीक असल्याचे सांगतो. तसेच आपल्यामध्ये फारशी लक्षणे नसल्याचेही त्याने सांगितले आहे. आधीच्या प्रकाराच्या संसर्गाच्या तुलनेत सध्या जास्त वेदना नाहीत व आजारीही वाटत नाही असे हेल्फगॉट म्हणतो. अल्फा प्रकाराची लागण झाल्यानंतर त्याला खूप ताप आल्याचेही त्याने सांगितले. परंतु इलॉन आता क्वारंटाईनला कंटाळला आहे. टाइम्स ऑफ इस्रायलच्या रिपोर्टनुसार, हेल्फगॉटने सांगितले की, त्याच्या वर्गातील 27 मुलांपैकी सुमारे 10 जणांना कोविड-19 ची लागण झाली आहे.

इस्रायलमध्ये कोरोना व्हायरसची परिस्थिती किती बिकट आहे, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, जानेवारीमध्ये नोंदवलेल्या कोविड प्रकरणांची संख्या संपूर्ण 2021 मध्ये नोंदवलेल्या प्रकरणांच्या बरोबरीची आहे. टाईम्स ऑफ इस्रायलच्या म्हणण्यानुसार, 2021 मध्ये 9,60,500 कोरोना व्हायरस प्रकरणे नोंदवली गेली. यावर्षी जानेवारीमध्ये 11,60,000 हून अधिक कोविड प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कोविड प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होण्यासाठी कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराला जबाबदार धरण्यात आले आहे. (हेही वाचा: ओमिक्रॉनच्या विरोधात लढण्यासाठी Moderna चा येणार खास बूस्टर डोस)

दरम्यान, भारतात कोरोनाविषाणू लसीचा तिसरा डोस दिला जात आहे, तर इस्रायल कोविड लसीच्या चौथ्या डोसकडे वाटचाल करत आहे. तज्ञ समितीने इस्रायली सरकारला 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना अँटी-कोविड लसीचा चौथा डोस देणे सुरू करण्याचा सल्ला दिला आहे.